अजूनही

ठाव ना तुझा तुला अजूनही
काय शोधसी मला अजूनही?
जागल्या कळ्या; सुकून चालल्या,
गंध मात्र राहिला अजूनही
ओळखू कसा तुझा स्वभाव रे?
जाणले न मी मला अजूनही
लांब जात सावल्याहि पांगल्या
तू दिवा न लावला अजूनही
सावळा न राधिका, न गोपिका
एकटा रिता झुला अजूनही
मीच जिंकले तरी हरायचा
डाव का न संपला अजूनही?
तोच नांदतो म्हणे चराचरी
का मला न भेटला अजूनही?
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा