गझलेच्या व्याख्या!

बेफिकीर's picture

गझलेच्या अनेक व्याख्या आहेत.

आत्तापर्यंतच्या वाचनातून, चर्चेतून व स्वानुभवातून जाणवलेल्या व्याख्या येथे देत आहे.

व्याख्या: -

1. प्रेयसीशी किंवा स्त्रीशी केलेला संवाद! व्यापक स्वरुपात आवडत्या व्यक्तीशी केलेला संवाद म्हणायला हरकत नाही. या व्याखेतून गझलला तिचा एक् मोठा गुण म्हणजे 'संवादरुपी काव्य' हे विशेषण लाभते. तसेच, गझल हे प्रामुख्याने प्रेम या विषयावरचे काव्य आहे हे गझलचे वर्णन इथे सार्थ होताना दिसते.

2. हरणाचे लालित्य - हरणाचे पाडस जसे नाजूक हालचाली करत मन रमवते तसे गझल हे मन रमवणारे काव्य आहे.

3. हरणाचे रूदन - शिकार्‍यापासून आपला बचाव होणे अशक्य आहे हे जाणवल्यावर हरणाच्या कंठातून जे रुदनाचे स्वर बाहेर पडतील तशी गझल असते. या व्याखेतून गझलला तिचे 'सर्वात' महत्वाचे अंग लाभते, ते म्हणजे 'व्यथा' सामावणारे काव्य

4. दैनंदिन अनुभुतींचे काव्य - अगदी अक्षरश: लहानात लहान अनुभव सुद्धा गझलेत घेता येऊ शकतो. मात्र, तो अनुभव आपल्याला आलेला तरी असला पाहिजे किंवा आपल्या सभोवताली कुणाला तरी आलेला आपण प्रत्यक्ष जाणलेले असले पाहिजे. म्हणजेच स्वत:चे अनुभव किंवा परकायाप्रवेश यां दोन्ही गोश्ह्टींना गझलेत मुभा म्हणण्यापेक्षा महत्व आहे. मात्र तो अनुभव नुसता मांडणे म्हणजे गझल नव्हे! ती एक बातमी झाली. त्या अनुभवाशी एक सार्वकालीन तत्व निगडीत आहे किंवा एक मानवी प्रव्रुत्ती किंवा विश्वातील एखादी मुलभूत गूढ गोष्ट निगडीत आहे हे दाखवून देणे म्हणजे गझल!

5. स्वगत - गझल म्हणजे बर्‍याच वेळा एक स्वगत असते. 'मी मला आलेले अनुभव चाळणे व त्यातून एक प्रमेयासारखे किंवा तत्वासारखे काहीतरी निर्माण करून स्वत:ची भूमिका स्पष्ट करून स्वत:वर ठसवणे' हा गझलेचा एक भाग असू शकतो.

6. निर्मीती - गझल म्हणजे निर्मीती अशी आणखीन एक व्याख्या आहे. कुणालाही येऊ शकणारा अनुभव हा नावीन्यपूर्ण पद्धतीने मांडणे व त्यातून एक द्रुष्टिकोन जगाला देणे म्हणजे गझल!

7. मन:शांतीसाठी असलेले काव्य - इतर कुठलेही काव्यही तसे मन:शांतीसाठी असतेच किंवा असू शकते. पण गझलेचा शेर वाचून कवी स्वत: किंवा रसिक प्रामुख्याने मन:शांती मिळवू शकतो याचे कारण म्हणजे गझलेचा शेर हा नित्य घडणार्‍या घटनांवर बहुतांशी अवलंबून असतो. त्यात सर्वसमावेशकता जास्त असते. उदा: अमिताभ बच्चनने प्रचंड मारामारी करून सत्तरच्या दशकापासून रसिकांना एक वेगळी अभिरुची दिली यात प्रामुख्याने सामान्य माणसाच्या मनात प्रस्थापित रचनेच्या बाबतीत असलेली सुडाची भावना शमली. यामुळेच ती अभिरुची सर्वसमावेशक व्हायला अजिबात वेळ लागला नाही. प्रेयसिशी गुलुगुलु बोलणार्‍या साजूक नायकांपेक्षा अमिताभ जवळचा झाला. तसेच निसर्गवर्णन, देशभकी, अध्यात्म यावरील काव्यापेक्षा गझल आपोआप सहजपणे जवळची होते. असे भिडणारे काव्य म्हणजे गझल!

8. गझल-तंत्र पाळणारे काव्य - गझलमधील अपेक्षित व्रुत्त, काफिया, अलामत, रदीफ यांचे नियम काटेकोरपणे पाळणारे, एकाच शेरात संपूर्ण व स्वतंत्र काव्य सामावणारे व शेरातील पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीशी सशक्त संबंध असणारे व अशा कमीतकमी सात शेरांची मालिका असलेले ( यावर मतभेद आहेत, काहींच्या मते कमीत कमी पाच ) काव्य म्हणजे गझल!

9. सर्वसमावेशक व्याख्या -

नाजूक, हळुवार शब्दरचनेतून प्रेमातील किंवा दैनंदिन आयुष्यातील अनुभुती व भावना, त्यातही प्रामुख्याने व्यथा, मांडतानाच त्या भावनांची तीव्रता प्रभावीपणे वाढवून अशी शब्दरचना करणे ज्यातून एकाच शेरातून मानवी आयुष्याशी निगडीत असलेल्या मूलभूत बाबींवर एक तंत्र-शुद्ध व स्वतंत्र काव्य निर्माण होईल व ते वाचून कवीला व रसिकांना अंतर्मुख व्हावेसे वाटतानाच त्यातून एक मन:शांतीची भावना निर्माण होईल व जगण्यासाठी एक नावीन्यपूर्ण प्रमेय प्रस्थापित होईल.

धन्यवाद!