माझी ही रचना 'गजल' मानली जाईल का?

वेदना हृदयातली ती परत तुज बघताच आली
अन मनाच्या आरशाची पारदर्शी काच झाली
निघुनी जो गेलास तेव्हा वळुनीही ना पाहिले
आज कैसी मैफिलीची फिरुनी तुजला याद आली ?
मूक झाली गजल माझी, शब्दही हरवून गेले
सूरराणी रागिणीची तान पण घेता न आली
छेडिल्या तारा सतारीच्या तरी झंकार नाही
द्यावया मुजरा तुला निस्तब्ध ही जणु रात झाली
ओळखीचे स्मित दिले तू चषक देता छलकता
मेघ आकाशात नसता ही कशी बरसात झाली ?
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
शक्य आहे
-मुकुंद,
मतल्यात आली व झाली हे काफिये स्पष्ट होत आहेत. ही गैर्-मुरद्दफ (रदीफ नसलेली)गझल होऊ शकेल. मतल्यात "गालगागा * 4" हे वृत्त स्पष्ट होते आहे. त्याच्या आधारे काही ठिकाणी वृत्त तपासावे लागेल.
निघुनी जो गेलास तेव्हा वळुनीही ना पाहिले
आज कैसी मैफिलीची फिरुनी तुजला याद आली ?
इथे निघुनि किंवा निघुन, वळुनि किंवा वळुन आणि फिरुनि फिरुन असे वाचले तरच वृत्तात बसेल.
ओळखीचे स्मित दिले तू चषक देता छलकता >> ह्या ओळीत एक शेवटचा 'गा' कमी आहे.
हे बदल केले की तांत्रिक दृष्ट्या ही गझल होऊ शकेल. बाकी शेर आवडणे, न आवडणे हे सापेक्ष आहे. मला स्वत:ला वरील बर्याच कल्पना आवडल्या.
पु.ले.शु.
~ नचिकेत आठवले
नाही....
ही गझल म्हणता येणार नाही. दुर्दैव! विषय खरच चांगले आहेत. पण मुळात तांत्रिकद्रुष्ट्या जी कविता गझल असते तीच पुढे खरोखरच गझल आहे की नाही यावर विचार करणे योग्य ठरते.
जोपर्यंत तंत्र विस्कळीत आहे तोपर्यंत त्यावर चर्चाच अयोग्य ठरते.
धन्यवाद
धन्यवाद नचिकेत आणि भूषण. मार्गदर्शन मोलाचे वाटले.
-मुकुंद