लघु/गुरू, मात्रा, वृत्त

नचिकेत's picture

मागे एकदा एका गझलेच्या व्याकरणाबद्दल चर्चा करताना लघु/गूरू, मात्रा इ. विषयी माहिती दिली होती. ती उपयोगी पडेल म्हणून इथे देत आहे.

१. लघु गुरू अक्षरांविषयी:
एखादे अक्षर हे लघू (र्‍हस्व) आहे की गुरू (दीर्घ) आहे हे त्या अक्षराच्या उच्चारणासाठी लागणार्‍या वेळावर (वजनावर) ठरते.
- अ, इ, उ हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने लघु म्हणजेच र्‍हस्व गणली जातात.
उदा. क, पि, वु इत्यादी
- आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने गुरू अर्थात दीर्घ गणली जातात.
उदा. का, णी, दू, जे, पै, पो, डौ, दुः, शं इत्यादी
- जोडाक्षर र्‍हस्व की दीर्घ हे त्याच्या स्वरावरून ठरते.
उदा. स्त, ज्ज, प्रि, ऋ ही जोडाक्षरे र्‍हस्व आहेत.
श्मा, र्‍या, ग्नी, स्थू, त्वे, श्री ही जोडाक्षरे दीर्घ आहेत.

- काही शब्दांमधील जोडाक्षरामुळे त्या जोडाक्षराआधी येणार्‍या र्‍हस्व अक्षरावर जोर किंवा आघात येतो. अशावेळी ते र्‍हस्व अक्षर दीर्घ गणले जाते.
उदा. पुस्तक - 'पु' र्‍हस्व असला तरी 'स्त' मुळे त्यावर जोर येतो. म्हणून इथे 'पु' दीर्घ समजावा. सज्जन, सुस्त, कर्म, मित्र, स्वस्त, स्वरबद्ध ह्यात अनुक्रमे 'स', 'सु', 'क', 'मि', 'स्व', 'ब' ही लघू अक्षरे दीर्घ होतात.
'तुझ्या', 'कळ्या' ह्या शब्दांमधे मात्र जोडाक्षरामुळे 'त', 'क' वर आघात येत नाही. म्हणून ही अक्षरे लघूच गणली जातात.

ह्या माहितीच्या आधारे आता शब्दांचा लघु-गुरू क्रम ठेरवता येइल. लघु अक्षरासाठी 'ल' व गुरू अक्षरासाठी 'गा' हा संकेत वापरला जातो.
उदा. समास - ल गा ल
विनासायास - ल गा गा गा ल
अकस्मात - ल गा गा ल ( 'स्मा' मुळे 'क' वर आघात येत आहे. म्हणून 'क' दीर्घ गणला आहे)
प्रिया - ल गा

२. मात्रांविषयी:
र्‍हस्व अक्षराची एक (१) व दीर्घ अक्षराच्या दोन (२) मात्रा मोजतात. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की अक्षर लघु आहे की गुरू हे आधी ठरते. त्यानंतर त्याच्या मात्रा ठरतात. वरचीच उदाहरणे परत घेतल्यास:
समास - ल गा ल - १+२+१ = ४ मात्रा
विनासायास - ल गा गा गा ल = १+२+२+२+१= ८ मात्रा
अकस्मात - ल गा गा ल - १+२+२+१ = ६ मात्रा
प्रिया - ल गा - १+२ = ३ मात्रा
मी - गा - २ मात्रा

३. वृत्ताविषयी:
'पाद' किंवा 'चरण' असलेली रचना म्हणजे पद्य. म्हणजेच कवितेतल्या एका ओळीला चरण म्हणतात. अशा अनेक चरणांचे मिळून काव्य तयार होते. गझलच्या भाषेत चरणाला 'मिसरा' म्हणतात. गझलचे सगळे मिसरे एकाच वृत्तात असायला हवेत. वृत्ताचे दोन प्रकार आहेत.

अक्षरगण वृत्त

अक्षरगण वृत्तात लिहिलेल्या गझलच्या मिसर्‍यांमधे येणार्‍या अक्षरांचा लघु-गुरू क्रम सारखा असतो. उदाहरणादाखल वैभव जोशी ह्यांच्या खालील ओळी बघू.

ऋतू येत होते ऋतू जात होते
ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा - हा ह्या मिसर्‍याचा लगा क्रम झाला. आता ह्यच्या पुढचा मिसरा पाहू

फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते?
ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा

आता हाच लगा क्रम उरलेल्या सर्व शेरांमधे यायला पाहिजे. क्वचित एका गुरूच्या ऐवजी दोन लघु वापरता येतात. उदा.
तरी ताटवे मग्न झुरण्यात होते
ल गा गा ल गा गा ल लल गा ल गा गा

वृत्तात लिहिण्यासाठी वृत्ताचे नाव माहित असणे गरजेचे नाही. :-) वेगवेगळ्या अक्षरगण वृत्ताची काही उदाहरणे:

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
लगालगागा | लगालगागा | लगा लगा गा|ल गाल गागा (किंवा लगालगागा * 4 वेळा)

हुंदका साधा तुझा सांगून गेला
गालगा गा|गा लगा गा|गाल गागा (किंवा गालगागा * 3 वेळा)

मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता
लगा गागा|ल गागागा! लगागा गा|लगा गागा (किंवा लगागागा * 4 वेळा)

अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
गागालगा लगागा | गागा लगाल गागा (किंवा गागालगालगागा * 2 वेळा)

मात्रा वृत

ह्यालाच जाती असेही म्हणतात. ह्यात मिसर्‍यांमधील अक्षरांचा लघु-गुरू क्रम व अक्षरांची संख्या सारखी असेलच असे नाही. पण प्रत्येक मिसर्‍यामधील मात्रांची संख्या सारखी असते. उदाहरणार्थ माझ्या एका गझलची ही ओळ:

पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला
गा गा गा गा गा ल गा ल गा ल गा ल गा गा = १४ अक्षरे
२+२+२+२+२+१+२+१+२+१+२+१+२+२ = २४ मात्रा

वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला
गा ल ल गा गा गा ल ल गा गा ल गा ल गा गा = १५ अक्षरे
२+१+१+२+२+२+१+१+२+२+१+२+१+२+२ = २४ मात्रा
ह्या गझलच्या उरलेल्या शेरांमधे २४ मात्रा(च) येणे गरजेचे आहे.

पण मात्रा वृत्तात लिहिताना नुसती मात्रा पुर्ती करून चालत नाही. कुठलीही गझल गुणगुणताना ती एका लयीत म्हणता यायला पाहिजे. त्यासाठी 'यती' चा विचार करणे आवश्यक आहे.
यती म्हणजे कुठलीही ओळ गुणगुणताना आपण काही ठिकाणी थांबतो, pause घेतो. त्या position ला/जागेला यती म्हणतात. उदा. वैभव जोशी ह्यांच्या एका नितांत सुंदर गझलेचा मतला असा आहे:

मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

आता ह्या दोन ओळी वाचताना आपण अनुक्रमे 'माझ्या' व 'आहे' ह्या शब्दांनंतर pause घेतो:
मज आयुष्याचा माझ्या | कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे | आलेला प्रत्यय नाही
इथे मात्रांचा हिशोब केला तर असे दिसेल की प्रत्येक ओळीत २८ मात्रा आहेत व १४व्या मात्रेनंतर यती. ह्यातलाच एक शेर पहा:
एका जन्माच्या पाठी | दुसर्‍या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे | नसणेही अक्षय नाही
इथे सुद्धा वरील मात्रांचा हिशेब कायम आहे.

४. गझलेचा आकृतीबंध:

हा गझलेच्या बाराखडीत दिलेला आहे.