कवडसा

राजू वैशंपायन's picture

कुठेही पडावा असा कवडसा मी
कुण्याही घरी अंगणीचा सडा मी

पहावे कुणीही मनाच्या तळाशी
कुणीही नटावे असा आरसा मी

जगाने मनांच्या कळ्यांना खुडावे
तरी घेतला हा स्मिताचा वसा मी

तहानेस अर्पून मी संपलेला
जळाचा घडा जो रिता तो रिता मी

किती लोक गेले शिकूनी तरीही
अडाणीच जो राहिला तो फळा मी

उद्याच्या जगाने जरी टाकलेल्या
सताचा शिवाचा जुना वारसा मी

प्रतिसाद

सुरेख गझल

सुरेख गझल !!!

अडाणी फळा ही कल्पना अप्रतिम

सगळेच शेर उत्तम आहेत
शुभेच्छा !!!