कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
कार्यशाळा म्हणजे एखाद्या शास्त्रशुध्द विषय अवगत होण्यासाठी आयोजित करता येणारं प्रशिक्षण होय. गझल ही काव्यविधा असली तरी गद्य कविता, मुक्तछंद कविता किंबहुना गीत काव्यापेक्षा तिच्यात काही अधिक बाबींची अट असते , काही संकेत असतात जे पूर्ण न करताच गझल रचना कवी करावयास गेल्यास ती गझल न बनता गझल आकृतीबंध सदृश काव्य रचनाच ठरेल. गझलची कार्यशाळा गझलकार घडवू शकत नाही. मात्र मूलतः "कवी" असलेल्या व्यक्तीला जर गेय काव्यरचनेची ओढ असेल तर तंत्राचे मार्गदर्शन करून प्रशिक्षण देऊन त्यास गझलकार होण्याची दिशा दाखविते .
एखादी उत्तम कविता आवडल्यास रसिकांना बहुधा तिच्यातला भावच स्मरणात राहतो, संपूर्ण कविता स्मरणात राहणे क्वचितच घडते. गझलेचा प्रत्येक शेर हा परिपूर्ण अशी स्वतंत्र कविता असते, दोन ओळीत कविता सूत्ररूप म्हणजे गागर मे सागर घेओओन येत असते. शेरात रदीफ व काफियाने तसेच छंदातील लयबध्द योजनेमुळे एक प्रकारची गेयता शेरात साकारलेली असते अन नेमकी हीच गेयता गझलचा शेर कवितेहून कितीतरी पटींनी लवकर कंठस्थ होण्यास कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ सुरेश भटांची ही द्विपदी पहा म्हणजे लक्षात येईल.
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते
गझलमध्ये रदीफ म्हणजे मतल्याच्या दोन्ही चरणांत येणारा वारंवार अंतिम शब्द अथवा वाक्य, प्रत्येक शेराच्या अंती पुनःपुन्हा येतो. काफिया म्हणजे तद्पुर्वी येणारे /अनुप्रास होय. हे दोन्ही गझलेला एका सुरेख व सुरेल लयीने माळतात .
रदीफ काफियांमुळे गझलेचे लयात्मक, तालात्मक स्तर व वजन वाढते. गझलेचा आंतरिक भाव दोह्याप्रमाणे ठाव घेणारा असणे तर महत्त्वाचे असतेच असते पण त्यातील छंद जितका लययुक्त असेल तितकाच त्वरित रसिकांच्या मनात त्यातील शेर दाखल होतो.
असेच हे कसेबसे कसे तरी जगायचे
असून माणासातही असायचे नसायचे
इथे लघु गुरू शब्दांचा क्रम कसा तालबध्द आहे.
याचप्रमाणे खावरचा पुढील गेय शेर बघा
हजार दुःखे मनात माझ्या हजार जखमा उरात माझ्या
वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या .
सुरेश भट, मधूसूदन नानिवडेकर, खावर यांच्या शेरात शब्द मांडणी, लघु गुरू वर्णाच्या विशिष्ट क्रमावर आधारलेली आहे. याला आधार छंदच आहेत.
गझल कार्यशाळेत याच छंदांचे संथ, मध्यम व जलद स्वरूप विशद करण्यात येते.
गझल लिहीताना छंदनिर्वाहासाठी कवी अनेकदा र्हस्व दीर्घ शब्दांची मांडणी चूक करतो. काहीवेळा अनावधानानेदेखील अशा चुका त्यांच्याकडून घडतात. काही शब्दांना दीर्घ ऐवजी र्हस्व लिहीण्याची उर्दूत मुभा आहे तशी मराठीत कवीला साहित्यमहामंडळाच्या शुध्दलेखनाद्वारे प्राप्त आहे. तरी दीर्घ शब्द र्हस्व करताना अर्थ भेद होत नाही याची दक्षता कशी घ्यावी हे ही कार्यशाळेत समजावून घेता येतं.
कवी गझलकार घडवता येत नाही पण त्यास आकार देता येतो. सुरेश भट म्हणतात " माझा न कुणी गुरू, माझा न कुणी चेला" पण स्वबळावर कला अवगत करणारे असे फार कमी लोक असतात. ठेचाळत, अडखळत, चुका करत अनुभवाने शिकण्यापेक्षा प्रारंभिक काळात कार्यशाळेसारखे मार्गदर्शन घेत सावरणे जास्त उत्तम.
प्रतिसाद
उद्बोधक लेख
चांगली माहिती मिळाली. धन्यवाद, वैभव.
खरं आहे..
चांगलाच फायदा होतो कार्यशाळेचा ..
प्रत्येक गोष्ट आपण अभ्यास करुन समजावुन घेऊ शकतो पण कार्यशाळेत हेच काम कमी वेळात होईल.