कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
१. वैयक्तिक पूर्वपीठिका
- भारतातले मूळचे कुठले?
माझे वडील मूळचे खानदेशातले, आई कोकणातली. मी मात्र पक्का मुंबईकर.
- शिक्षण कुठे झालं आणि कशात?
बी.ई. मी व्ही.जे.टी.आय. मधून केले - संगणकशास्त्रात. इथे अमेरिकेत काम करता करता मी MS in Management आणि MS in Software Engineering केले.
- अमेरिकेत केव्हा आलात?
१९९७ ऑगस्टमधे.
- आता काय काम करता?
सध्या मी Royal Bank of Canada या कंपनीच्या brokerage विभागात Software Product Manager म्हणून काम करतो.
- ‘पुलस्ति’ हेच खरं नाव आहे का? त्याचा अर्थ काय?
:) हो. हेच माझं खरं नाव. 'पुलस्ति' हा एक ऋषी होता. हा रावणाचा आजोबा (खरंच :)) होता. रावणाला म्हणूनच 'पौलस्त्य' असेही संबोधतात. असो...
२. साहित्यिक पूर्वपीठिका
- कवितांची आवड कधीपासून लागली?
अगदी लहानपणापासून. शालेय पुस्तकातल्या काही काही कविता खूप खूप आवडायच्या. 'फुलपाखरू, छान किती दिसते', 'टपटप टाकित टापा', 'वासुदेव आला' वगैरे... २ रीत असताना मी माझी पहिली कविता लिहिली. अजूनही आहे माझ्याकडे. जसे मिळत गेले - वाचत गेलो, जसे जेव्हा सुचत गेले - लिहित गेलो.
- घरी वातावरण वाचन/लेखनाला पोषक होतं का?
अगदी! माझे आई आणि वडील - दोघेही हाडाचे शिक्षक. भाषा आणि गणिताबद्दल (हो, हे combination थोडे वेगळे आहे...) आवड, आदर आणि अभिरुची अगदी लहानपणापासूनच भिनली.
- आवडते कवी कोण?
ज्ञानेश्वर, तुकाराम, कुसुमाग्रज, गदिमा, विंदा, बहिणाबाई, बोरकर - ही काही नावं चटकन येतात तोंडावर. पण इतरही काही कवींच्या काही काही कविता मनावर खोलवर घर करून आहेत. रुद्रास आवाहन, नवा शिपाई, यशवंतांची 'आई', तांब्यांची 'जन पळभर', सुर्व्यांची 'गिरणी' इ. मर्ढेकर, दि.पु.चित्रे, सुरेश भट असे कितीतरी महत्वाचे कवी मी अजून पुरेसे वाचलेच नाहियेत.
- तुम्ही कधी लिहायला लागलात?
तशी मी माझी पहिली कविता इ. २रीत असताना लिहिली. पण मी नियमीत लिहिणारा कधीच नव्हतो, अजूनही नाही. कवितांची खूप आवड आहे, पण इतर कोणत्याच गोष्टींची तशी नावडही नाहिये! त्यामुळे गोल्फ, पोकर, टेनिस, चित्रपट अशा १० इतर गोष्टीत हात्-पाय मारता मारता जसं जेव्हा सुचेल ते लिहिलं. नेट लावून 'दिसामाजी..' असं कधी जमलं नाही. खरं तर तसा प्रयत्नही कधी केला नाही.
- गज़लकडे कधी आणि कसे वळलात?
उर्दु गझलांचं थोडाफार गालिब ऐकल्यामुळे आणि वाचल्यामुळे पूर्वीपासूनच आकर्षण होतं. गझलेबद्दलचे बारकावे मात्र अजिबात माहीत नव्हते. गझल लिहिण्याचाही प्रयत्नही पूर्वी कधी केला नव्हता. पूर्वाने - माझ्या पत्नीने - मनोगत साईटबद्दल सांगितलं आणि मागच्या वर्षीच्या उत्तरार्धात मी खर्या अर्थाने गझलकडे वळलो. मनोगतावरील वैभव, प्रसाद, मिलिंद फणसे, कुमार जावडेकर, चित्त, सारंग यांच्या गझला वाचत वाचत, जमेल ते समजत समजत, वेडेवाकडे पण प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो. नंतर मायबोलीवर स्वाती, बैरागी, वैभव, चक्रपाणि यांच्या मार्गदर्शनाने वजन, वृत्त, रदीफ, काफिये, अलामत हे बारकावे कळत गेले. मायबोलीच्या कार्यशाळेने मी गझलेत निदान 'साक्षर' झालो.
- मराठीव्यतिरिक्त हिंदी/उर्दू शायरीही वाचता का?
ऐकतो - (ऐकायचो, हल्ली नाही पुरेसा वेळ मिळत. हो, नेहेमीचे रडगाणे:)) - खूप. जगजीत सिंग, गुलाम अली, हरिहरन, मेहेदी हसन हे सगळे फार जिवलग 'कानमित्र' आहेत! इंटरनेटवर गालिब, दाग, जावेद अख्तर, साहिर, कैफी आजमी वाचायला मिळतात.
- इतर भाषांच्या तुलनेत मराठी गज़लची म्हणून काही वैशिष्ट्यं किंवा कमतरता जाणवतात का?
माझं खरच मराठी गझलेचं तितकसं वाचन नाहिये. आता मराठीगझल.कॉम आणि सुरेशभट.इन मुळे उत्तमोत्तम गझला वाचायला मिळताहेत. आतापर्यंत जे काही वाचलंय त्यावरून एक निरिक्षण नोंदवावसं वाटतं. मराठी गझलेत एक वेगळेपणा असा जाणवतो की ती जास्त 'रोखठोक' वाटते. आणि मला वाटतं तो या भाषेचा आणि मातीचाही गुण असावा.
- तुमच्या गज़ल/कवितांचं पुस्तक वगैरे प्रकाशित झालं आहे का? करायचा विचार आहे का?
पुस्तक प्रकाशित करण्याइतपत लिखाणच झालं नाहिये हो! ते 'संख्याबळ' आलं की करू विचार! सध्या तरी आपण लिहिलेलं मोडकंतोडकं या संकेतस्थळांवरचे रसिक, कवी, जाणकार वाचताहेत, त्यांनी लिहलेलं आपल्याला वाचायला मिळतंय - यावरच अस्मादिक खूष आहेत!
३. गज़ललेखन
- तुमची गज़ल लिहीण्याची नेमकी प्रोसेस सांगू शकाल का? म्हणजे सहसा सुरुवात कुठून होते? एखादं वृत्त आवडलं - यात लिहून पाहू, किंवा एखादा विचार शेर म्हणता येईल अश्या फॉर्ममधे सुचला, किंवा कसं? की मतलाच आधी लिहीता? आणि ज़मीन निश्चित करूनच मग पुढे जाता?
सुरुवातीची प्रेरणा ३ पैकी कुठलीही असू शकते - लय (वृत्त), शब्द किंवा कल्पना. मूळ प्रेरणा म्हणून या तिघांत सूक्ष्म गुणात्मक फरक आहेच. पण माझ्यासारख्या शिकाऊ उमेदवाराला त्याने फरक पडत नाही. उदा. 'वर्म' ची सुरुवात मला 'जुन्या वर्मावरचा ओळखीचा वार' या कल्पनेने झाली, तर 'पाचोळा' 'माणसांचा|गावआहे या छोट्या बहरची गझल लिहून बघुया' अशी सुरू झाली. जर शब्द किंवा कल्पनेने प्रक्रिया सुरू झाली असेल तर पुढचा टप्पा वृत्त ठरवण्याचा असतो. जमीन निश्चित करणे जरा जड जाते - आणि मतला तर विचारू नका! गझलेतला माझ्यासाठी सर्वात कठीण भाग म्हणजे मतला! मतला सुचला की उरली गझल पूर्ण करायला फारसा वेळ लागत नाही.
- पहिला शेर लिहून झाल्यावर पुढचा विचार संभाव्य यमकांचा असतो का?
असतोही आणि नसतोही. म्हणजे एक सहज्-प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मनात अर्थातच काफिये घोळायला लागतात. पण यमकांसाठी यमकांचा विचार करून चांगली गझल हातात पडत नाही. मुळात जरी काफिये घोळत असले तरी त्या काफियाला जुळणारं सकस असं काहितरी सुचलं पाहिजे ना. म्हणजे एकतर सुचलेल्या कल्पनेत बसणारा काफिया शोधा नाहितर सुचलेल्या कफियासाठी कल्पना शोधा. शोधाशोध टळत नाही! त्यामुळे काफियांची चळत तयार असल्याने गझलनिर्मितीतली quality आणि efficiency यात काही उपयोग होत नाही. झालाच तर तोटाच होतो.
- एखादी गज़ल काही शेर लिहून पुढे पडून राहिली असं कधी होतं का? की तिच्या खनपटीलाच बसता?
असं होतं. खनपटीला बसायचा प्रयत्न करतो. कारण एकदा तो विशिष्ट (अनंत ढवळेंनी म्हटल्याप्रमाणे - emotive; cognitive नव्हे) ओघ सुटल्यावर पुन्हा मला ते फिरून पूर्ण करता येईल अशी माझी मला शाश्वती वाटत नाही. लिखाणाबद्दलची माझी शिस्त अजून तयार झाली नाहिये.
- मध्यंतरी गज़लमधे ५ शेर हवेतच का, अशीही चर्चा झाली होती. तुमचं काय मत?
मला वाटतं हवेत. ५ शेरांचे बंधन हटवले तर - तर्कानुसार - अगदी एका शेरालाही गझल म्हणावे लागेल. नाहितर ४ तरी का? ३ तरी का? २ तरी का? हे प्रश्न राहतीलच. एका शेराला गझल म्हणायला जोपर्यंत गझलकार आणि रसिकवर्ग तयार होत नाहीत तोपर्यंत - मग इतर कुठल्याही आकड्यापेक्षा ५ - लेखन, वाचन आणि आस्वादनाच्या दृष्टीने - मला जास्त योग्य वाटतो.
- एकदा लिहून झालेल्या गज़लकडे कालांतराने पुन्हा वळून बदल/सुधारणा केली- असं होतं का?
होतं. अगदी बर्याचदा नाही, पण होतं.
- गज़लच्या सहजते/क्लिष्टतेबद्दल आपण चर्चा वाचतो. या बाबतीत तुमचा दृष्टीकोन/धोरण काय आहे? म्हणजे एखादा शेर लिहीताना तो सोपाच असला पाहिजे असं भान ठेवता का, किंवा एखादा चांगला विचार मांडल्यावरसुद्धा केवळ वाचणाऱ्याला तो क्लिष्ट वाटू शकेल म्हणून शेर बदलता का?
ही माझी अतिशय आवडती चर्चा आहे! माझा क्लिष्ट लिहिण्याचा स्वभाव नाही. त्यामुळे मला या प्रश्नाशी जास्त झुजावे लागत नाही. पण माझं प्रामाणिक मत असं की - कवीचे लिखाण शेवटी त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते. एखाद्या कलाकृतीच्या सोपेपणावर किंवा क्लिष्टतेवर तिच्या दर्जाचे मूल्यमापन होऊ शकत नाही - करूही नये. "गझलेत ग्रेसाळलेल्या भाषेला जागा नाही" असं कुठेतरी वाचनात आलं होतं. ग्रेस मलाही कळत नाहीत. पण तसे मला व्हैन गोग किंवा पिकासोही कळत नाही. एवढच कशाला सुरेश भटही मला आताशाच कळायला लागलेत! पु.लं चं साहित्यिक कतृत्व वादातीत होतंच पण मला विशेष जाणवतं ते त्यांच 'रसिक'कतृत्व. संगीत, साहित्य, नाट्य, शिल्प, समाजकारण, राजकारण... केसरबाईंपासून बालगंधर्वापर्यंत, माटे मास्तरांपासून भालचंद्र नेमाडेंपर्यंत आणि बाकीबाबू बोरकरांपासून आरती प्रभूंपर्यंत सर्व प्रकारच्या अस्सल कलाकतृत्वाला कवेत घेऊ शकणारी त्यांची अभिजात रसिकता होती! म्हणून - कळत नसले तरी कळू शकते, तेवढी आपल्या रसिकतेची तयारी हवी. शेवटी - क्लिष्टतेसाठी क्लिष्टता नसावीच, पण सोपेपणासाठी सोपेपणाही. याने एक mediocrity येण्याचा धोका असतो. विचारात सच्चेपणा असावा, लिखाणात आळशीपणा नसावा एवढे खरे असे मला वाटते.
- गज़ल लिहीताना तिच्या गेयतेचा विचार असतो का? तो गरजेचा आहे असं तुम्हाला वाटतं का?
वृत्तबंधनामुळे गेयता येतेच. वृत्ताशिवाय - आणि म्हणून गेयतेशिवाय - गझल होऊ शकत नाही.
- उत्तम गज़लचे तुमचे निकष काय आहेत?
व्याकरणशुद्ध असावी - गझलेचे व्याकरण आणि भाषेचेही. बाकी वजन, नजाकत ई निकष मुद्देसूदपणे प्रसन्न शेंबेकरांनी सुरेशभट.इन वर मांडले आहेत. माझे असे काय निकष असणार? तरी मला एक मुद्दा मांडावासा वाटतो. प्रत्येक शेर रसिकाला गुंतवणारा असला पाहिजे - त्याला विचार करावासा वाटला पाहिजे, किंवा क्षणभर तो अंतर्मुख झाला पाहिजे किंवा त्याच्या तोंडून मनापासून दाद निघाली पाहिजे!
म्हणजे थोडक्यात - सचिन च्या (हो, बरं ३ वर्षांपूर्वीच्या) ब्याटिंगसारखी - तंत्रशुद्ध तरी खिळवून ठेवणारी!
- गज़लव्यतिरिक्त इतर काव्यप्रकार कमी हाताळताना दिसता. ते का? सुचलेली कल्पना गज़लच्या आकृतीबंधात नाहीच बसली तरच कविता, असं काही गणित आहे का?
नाही असंच काही गणित नाहिये. याचं एक उत्तर हे की वर सांगितल्याप्रमाणे मी मुळात कमी लिहितो. आणि सध्या तर गझलेचे वेड आहे!
४. शेवटी महत्वाचं
- कार्यशाळेचा अनुभव कसा वाटला? त्यातून खरंच काही शिकायला, निदान विचार करायला मिळालं असं वाटलं का? आपल्या लिखाणातली बलस्थानं आणि त्रुटी लक्षात यायला कार्यशाळेमुळे मदत झाली का?
नक्कीच. इथल्या सहाध्यायिंची तल्लख बुद्धिमत्ता, बारीक निरिक्षणशक्ती, खोल आकलनक्षमता - यामुळे या कार्यशाळेतल्या गझला, गझलांवरच्या चर्चा-प्रतिक्रिया हा एक दर्जेदार अनुभव होता. मायबोलीपाठोपाठ या कार्यशाळेमुळे माझ्या लिखाणातल्या काही विशिष्ट चुका (उदा. शब्द किंवा शब्दसमूह मिसर्यात अध्यहृत धरणं) माझ्या लक्षात आल्या आहेत आणि पुढच्या लिखाणावेळी त्यांच्यावर माझे खास लक्ष असेल! शिवाय या कार्यशाळेत कुमार, चित्त, वैभव, स्वाती, ओंकार, प्रसाद यांनी जो वेळोवेळी सहभाग घेतला त्यानेही खूप मदत झाली. संयोजकांचे, सर्व सहाध्यायांचे आणि मार्गदर्शकांचे या उपक्रमाबद्दल मनापासून आभार!
प्रतिसाद
अभिनंदन
पुलस्ति,
मन:पूर्वक अभिनंदन!
'माझा क्लिष्ट लिहिण्याचा स्वभाव नाही' हे सर्वांत आवडलं; पटलं...
तुमचं लिखाण आणि प्रतिसाद असेच असतात!
- कुमार
अभिनंदन
पुलस्ति, आपले अभिनंदन. आपल्या गझलेतील मक्ता खूपच अप्रतिम. आपल्याकडून असेच उत्तम लेखन वाचायला मिळो.
नचिकेत आणि कुमार, आपलेही अभिनंदन
कार्यशाळा आणि शेरखान स्पर्धा या दोन्हीमुळे गझल लेखनास मदत झाली यात श.न्का नाही. संयोजकांचे म्हणूनच आभार मानावे तेवढे कमीच आहेत,
सोनाली
अभिनंदन..
वा!पुलस्ति... मस्त मुलाखत... 'काफियांची चळत असल्याने होऊ शकणारा तोटा...' पटलं!!
कुमार,नचिकेत,सोनाली तुमचे सर्वांचे अभिनंदन...
असेच लिहित रहा.
शुभेच्छा :)
-आपले आभाळ :)
धन्यवाद
कुमार, सोनाली, आभाळ - धन्यवाद! माझे प्रयत्न सुरू राहतील..:)
अभिनंदन आणि शुभेच्छा!
पुलस्ति,
अभिनंदन आणि शुभेच्छा! मुलाखत अगदी सराईत आणि चांगली झाली आहे.
चित्तंरजन
अभिनंदन!
पुलस्ति, मनापासून अभिनंदन !!
अशाच अजून भरपूर गझला आम्हाला वाचायला मिळोत.