निरोप घेताना..

प्रिय सहाध्यायी,

आज आपल्या कार्यशाळेचा अखेरचा दिवस. कार्यशाळेतील विजेते, 'शेरखान', सर्वोत्कृष्ट गझलकाराची मुलाखत, पारितोषिकं याची आपण वाट पहात असाल. हे सर्व यथावकाश (म्हणजे लवकरात लवकर - शक्यतो सोमवारीच) प्रकाशित करूच. :)

पण आज या टप्प्यावर काही क्षण थांबून मागे वळून पहावंसं वाटत आहे.

इथे कार्यशाळा सुरू करताना मायबोलीवर घेतलेल्या यशस्वी (आणि बहुचर्चित) कार्यशाळेचा अनुभव गाठीशी होता. त्या कार्यशाळेचा उद्देश प्रामुख्याने 'गझल' या काव्यप्रकाराशी आपल्या ज्या कवी आणि रसिक मित्रमंडळींची फारशी ओळख नाही, त्यांना ती करून द्यावी असा होता. तो बर्‍याच अंशी सफलही झाला.

या कार्यशाळेचा उद्देश थोडा निराळा होता. ही ओळख वृद्धिंगत व्हावी, सगळ्यांनीच या विषयाबाबत त्यांना असलेल्या माहितीची, मतांची, कल्पनांची आणि प्रश्नांचीही देवाणघेवाण करावी, त्यासाठी एक common ground (जमीन?) उपलब्ध करून द्यावं असं वाटत होतं. आणि म्हणूनच जे विजेते ठरतील त्यांचं कौतुक आहेच, पण सगळ्याच सहभागी झालेल्या सदस्यांचे आम्ही ऋणी आहोत.

आम्ही या क्षेत्रातले 'तज्ञ' असल्याचा आमचा दावा कधीच नव्हता, तसेच आमच्या कवीत्वाबद्दलही कसलेच गंड नव्हते आणि नाहीत. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे..' ही उर्मी मात्र प्रचंड होती. 'आमच्या गझलांचं मूल्यमापन करणारे तुम्ही कोण?' असा प्रश्न कोणाला पडू शकतो. त्याचं उत्तर फक्त 'संयोजक' हेच आहे, ते 'जाणकार' असं असल्याचा आमचा दावा नाही.

कार्यशाळेमुळे आम्हाला काय मिळालं ते शब्दांत सांगणं जवळपास अशक्य आहे. गेली काही वर्षं आम्ही ज्या काव्यप्रकाराच्या अक्षरशः प्रेमात पडलो आहोत, त्याच्याच वाटेवरचे तुमच्यासारखे सहप्रवासी भेटले ही सर्वात मोठी कमाई.

तुमचा या कार्यशाळेचा अनुभव कसा होता? तुम्हाला यातून काही मौलिक मिळालं का? कुठल्या बाबतीत अपेक्षाभंग झाला का? आपल्या या संकेतस्थळाचं उद्दिष्ट लक्षात घेता असे आणखी कोणते उपक्रम राबवता येतील असं तुम्हाला वाटतं? हे सर्व जाणून घ्यायला निश्चितच आवडेल.

आपणा सर्वांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!

- नियामक मंडळाच्या वतीने,
- स्वाती.

ता. क. :
कार्यशाळेची, तसंच 'शेरखान' स्पर्धेची संकल्पना वैभवची होती. तांत्रिक बाजू प्रसादने सांभाळली. बर्‍याच गझल सारंगने निर्दोष करून घेतल्या. या सर्वांनी आपल्या कामातून आणि लिखाणातून वेळ काढून, वेळप्रसंगी आपली कामं बाजूला ठेवून कार्यशाळेचं काम केलं. त्यांचे आभार मानले तर त्यांना राग येईल, पण त्यांच्या योगदानाची दखल घ्यायलाच हवी, नाही का?

- स्वाती.

प्रतिसाद

ता. ता. क.

स्वाती च्या ता. क मध्ये सांगायची राहिलेली महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यशाळेचा दैनंदिन कारभार (गझल स्वीकारणं, प्रतिसाद देणं, गझल निर्दोष करून घेणं, गझल आणि 'शेरखान' प्रकाशित करणं इ इ अनेक कामं) स्वाती ने सांभाळला. स्वातीच्या अत्यंत उत्साही आणि कार्यक्षम संयोजनामुळे ही कार्यशाळा नियोजित वेळेमध्ये व व्यवस्थितपणे पूर्ण झाली.

स्वाती आणि बाकीचे सारे,

-पुन्हा एका उपक्रमाच्या यशस्वी सांगतेनिमित्तानं सार्‍यांचं अभिनंदन! "सहाध्यायी" शव्दाची उपयोजना आवडली.
माझ्या मनात आलेली कल्पना अशी की पुढचा टप्पा म्हणून आता एखाद्या मिसर्‍याच्या ऐवजी एक वृत्त संदर्भासाठी देऊन एखादी कार्यशाळा करावी. आणि मी पूर्वी असंही सुचवलं आहे की सामान्यत्वानं आढळलेली बलस्थानं आणि त्रुटी या दोन्हीवर ज्येष्ठांनी मोजक्या शब्दांमधे, का होईना, काही मार्गदर्शक लिहावं.

मान्यवरांनी विचार करावा.

-सतीश

धन्यवाद, माझं निरीक्षण.

सतीश, सुधीर,

ज्येष्ठांनी या बाबतीत मार्गदर्शन करावं या विनंतीला माझंही अनुमोदन आहे. आपण त्यांची वाट बघूच.
तोवर सहाध्यायी म्हणून माझी वैयक्तिक निरीक्षणं/मतं सांगायचा प्रयत्न करते. ही सगळी मतं अतिशय सापेक्ष आहेत याची मला कल्पना आहे, तसंच त्रुटी माझ्याही गझलला लागू होतात हे आधी स्पष्ट करायला हवं. चुभूद्याघ्या. :)

बलस्थानं:
१. कल्पनावैविध्य
एकच जमीन असल्यामुळे हे प्रकर्षाने जाणवलं. गझलच्या 'थीम'पासून शेरांमध्ये मांडलेले विचार / कल्पना यात खूप वैविध्य दिसून आलं.

२. मराठमोळ्या प्रतिमांचा वापर
संत ज्ञानेश्वरांचा संदर्भ दोन गझलांमध्ये वापरला गेला, पालखी,दिंडी यांसारखे संदर्भ वापरले गेले. हेच भाषेबद्दलही म्हणता येईल. लहजाच्या नावाखाली निष्कारण कोणी उर्दूप्रचूर शब्द वगैरे वापरलेले दिसले नाहीत.

३. सच्चेपणा
गझल म्हणजे कलंदरी/बेदरकारी/तुच्छता/सगळ्या जगाबद्दलची चीड/आत्मघातकी प्रेमाचे दाखले - असा कोणाचा दुर्दैवी गैरसमज झाला असेलच, तर त्याला उत्तर म्हणून आपल्या कार्यशाळेतील गझलांकडे मी अभिमानाने निर्देश करीन. ज्याचा जसा स्वभाव आणि अनुभवविश्व आहे तसं त्याने लिहीलंय. कोणीही असे काही पूर्वग्रह ठेवून लिहीलेलं दिसलं नाही.

सुधारणेस वाव असलेल्या बाबी:
१. प्रत्येक शेरची स्वयंपूर्णता.
सद्ध्या आपल्या नकळत मागच्या पुढच्या शेरांना 'टेकून' उभे असलेले शेर ब-याचदा लिहीले जातात. कधी कधी हा संबंध सहज लक्षात न येण्याइतका subtle असतो. त्याकडे अधिक डोळसपणे लक्ष पुरवणं गरजेचं आहे.

२. वृत्तासाठी तडजोडी.
ही एक प्रकर्षाने जाणवलेली बाब. (याला माझीही गझल अपवाद नाही.) वृत्तपूर्तीसाठी एका गुरूच्या जागी दोन लघू वापरणे (वा उलट), भरीची सर्वनामे वा एकाक्षरी शब्द वापरणे, काही शब्द अध्याह्रत धरणे (याचा उल्लेख पुलस्तिंच्या मुलाखतीत आला आहे.) अश्या प्रकारच्या तडजोडी टाळता आल्यास उत्तम.

३. शेरची सहजता / स्पष्टता.
खूप छान कल्पनासुद्धा नीट मांडली न गेल्यामुळे शेर हवा तितका परिणामकारक झाला नाही असं काही शेर वाचताना वाटलं. पण हा सरावाचा भाग म्हणता येईल.

४. वृत्तांतात्मक शेर.
नुसती अलंकारिक वर्णनं गझलला मानवत नाहीत. ती कवितेत चालतात, नव्हे, शोभतातही. पण गझल ही 'कैफियत' असते. पाहिलेल्या, घडलेल्या गोष्टींवरचं आपलं चिंतन त्यात येणं अपेक्षित आहे असं म्हणता येईल.

या बाबतीत ज्येष्ठ मार्गदर्शन करतील अशी आशा करूच, पण मला सर्वांचीच मतं जाणून घ्यायला आवडेल.

जयश्री अंबासकर's picture

अभिनंदन !!!!!!!!!!!

स्वाती, वैभव, सारंग, प्रसाद...........! ह्या मराठी गझल.कॉम चं वेड आता पसरत चाललंय हं....!! सगळं श्रेय तुम्ही लोकांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला आहे. अगं किती सगळ्यांनी वाहून घेतलंय गं. भारतात गेल्यामुळे थोडा खंड पडला ह्याची फारच खंत वाटतेय.
सगळ्या विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. इतका सुरेख प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे सगळ्यांना आपापली कलाक्रुती सादर करायला वाव मिळाला. दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं. आमच्या सारख्या नवशिक्यांना अजून काय हवं....?
अशीच वाटचाल गझलेची अखंड सुरु राहो....आम्ही त्यातले वारकरी आहोतच.
पुन्हा एकदा अभिनंदन !!!

ह्या निमित्ताने...

स्वाती...निरीक्षण..छानच आणि मार्गदर्शक.
ह्या निमित्ताने वरील काही मुद्द्यांवर माझे मत...
१)कल्पनावैविध्य:
कल्पनावैविध्य हा तर कोणत्याही काव्यप्रकाराचा आत्मा आहे. कार्यशाळेतील सर्वच गझलात वेगवेगळ्या कल्पनांचा आविष्कार होता. पण तरीही कल्पनांच्या पातळीवर आपली बाजू भक्कम करण्यासाठी गझलकाराने वैयक्तिक श्रम घेतले पाहीजेत अस माझं मत. केवळ 'कल्पनेसाठी कल्पना'नकोय. काही गझलांमध्ये त्याच त्याच कल्पना आल्याचं जाणवतं... त्यामुळे गझल कंटाळवानी होण्याचा धोका जास्त.
उदा: माझ्या गझलेतील शेर:
'पाहिले प्रतिबिंब मी अंधारलेले
आरश्याशी चेहरा भांडून गेला'
किंवा 'भाव माझा तो तरी सांगून गेला' etc.
हे सगळं लिहिलेलं तेच तेच रटाळ. प्रथम लिहिताना वाटतं 'वा!हा आपला शोध.Eureka!!'.पण नंतर निरपेक्षपणे वाचलं की फोलपणा जाणवतो.
तेव्हा कल्पनेला नाविण्याची जोड हवी.जगण्याचं अनुभवविश्व जसं वाढंत जाईल तसं नाविण्यही!

२) प्रतिमांचा वापर.
साध्या सोप्या सहज प्रतिमांचा वापर हे ह्या कार्यशाळेचे एक वैशिष्ट्य! उगाचच जाणून बुजून क्लिष्टपणा कुठेही प्रकट झाला नाही. काही ठिकाणी कोडे सोडविल्याचा भास झाला पण नंतर सुटल्यामुळे आनंदही झाला.मराठमोळ्या प्रतिमांचा वापर चांगला झाला आहे.उर्दूकडून उसनवारी झाली नाही.

३)सच्चेपणा :: स्वातीशी सहमत. उगाच विद्रोहाचा अट्टाहास किंवा बंडाची आरोळी ,निष्ठेचा दर्प नव्हता.
स्वत:चं पूर्ण नाही पण थोडंफार प्रतिबिंब ही पडलं तरी लिहिल्यांचं सार्थक झालं असं मी म्हणेन.
शेवटी गझल ही एक कविताच असते. कविता हा अभिव्यक्तीचा Superset ,गझल त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण Subset.पूर्वग्रह असलाच तर तो सुद्धा अनुभवविश्वाचा एक अपरिहार्य भाग आहे म्हणून प्रकटीकरणासाठी महत्त्वाचाही.
-----------------------------
सुधारणेस वाव असण्यार्‍या Factors वर स्वातीने प्रकाश टाकलाच आहे. इतर जाणकारांनीही मार्गदर्शन करावे ह्या विनंतीला अनुमोदन.
धन्यवाद,
-आपले आभाळ :)

अभिनंदन

कार्यशाळेच्या यशाबद्दल अभिनंदन.

सतीशना अनुमोदन, या प्रक्रीयेत दिसून आलेल्या लिखाणातल्या त्रुटी कळल्या तर पुढच्या लिखाणासाठी उपयुक्त ठरतील.

सुधीर