३२ : चातक

हुंदका साधा तुझा सांगून गेला
'भेटणे नाही अता' बोलून गेला

काळ तो त्याला कुणाची काय पर्वा?
तो हवे त्याला तसे वागून गेला

नेत होते ते तुला ओढून तेंव्हा
कोणता तो शाप मज थिजवून गेला?

स्वप्न माझे हे असे सजते कशाला?
व्हायचा तो सोहळा होऊन गेला

सुन्न वारे, सुन्न तारे, सुन्न सारे
हुंदका तो या जगा हेलावून गेला

प्रतिसाद

छान!

मतला चांगला निभावला आहे. काळ आणि सोहळा हे शेर आवडले!
शाप शेर जरा अस्पष्ट वाटला.
शेवटचा शेर - सानी मिसर्‍यात वृत्तभंग आहे. एक 'गा' जास्त आहे. उला मिसराही जरा कमजोर वाटतो. चू.भू.द्या.घ्या.
-- पुलस्ति.

छान!!

पुलस्तिंशी सहमत....
'सोहळा' विशेष आवडला.
वृत्तभंग आहे, हे ते दुरूस्त करावे.
-आपले आभाळ :)

'शाप'

पुलस्ति,
माझ्या मते मतल्यातील 'हुंदका' हा स्त्री च्या असहायतेचे प्रतीक आहे व तिची संकटाच्या क्षणी (सुटका करू शकण्याची क्षमता असूनही) ऐनवेळी निष्क्रिय होणार्‍या शक्तीना पण कसला तरी 'शाप' असतो असा त्या शेराचा अर्थ आहे.या शेरावरून द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळची पांडवाची किंवा भिष्मांची निष्क्रियता आठवल्याचे माझ्या एका मित्राने सांगीतले. कदाचित हा शेर अधिक चांगला होऊ शकतो.सूचनांचे स्वागत आहे!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
चातक
ता.क: सुधारीत मक्ता खाली प्रतिसादात दिला आहे. दाद यावी.

दाद

काळ, स्वप्न शेर आवडले.
शेवटच्या शेरात गडबड? पुलस्तिशी सहमत.

व्हायचा तो सोहळा होऊन गेला

काळ तो त्याला कुणाची काय पर्वा?
तो हवे त्याला तसे वागून गेला

व्हायचा तो सोहळा होऊन गेला

हे विशेष आवडले.

झाड's picture

आवडली! मतला

आवडली!
मतला खासच!!

वाह

मतला अगदी सहज सुंदर.
नेत होते.. व्वा! जन पळ भर .. आठवलं. सत्य!
मक्ता.. खरा खूप छान आहे. पण वरील सर्व गझलमित्रांशी सहमत.
ही पुर्ण गझल एकाच विषयावर आहे ना?

एकच विषय!

मेघधारा,
ही पूर्ण गझल एकाच विषयावर आहे ना?
या गझलेतील सर्वच शेर 'हुंदक्या'च्या 'मूड'चे झाले आहेत हे खरे! त्यात काही गैर नाही असे मला वाटते. आपले मत कळवावे!
चातक

नचिकेत's picture

छान...

छान गझल आहे, चातक. 'काळ' आणि 'सोहळा' विशेष. शेवटच्या मिसर्‍यातला तो दोष तेवढा राहून गेला. :-)

पु.ले.शु.
- नचिकेत आठवले

चांगली आहे.

नेत होते ते तुला ओढून तेंव्हा
कोणता तो शाप मज थिजवून गेला?

स्वप्न माझे हे असे सजते कशाला?
व्हायचा तो सोहळा होऊन गेला

हे उत्कृष्ट शेर.
बाकीचेही चांगले.
मक्त्यातला वृत्तभंग खटकला.
गझल उत्कृष्ट करता आली असती.(७.५/१०! पण अरेरे!...)
तरीही चांगली आहे.
वृत्तभंगामुळे बाध येतो.
माझे-६/१०.

व्वा

काळ तो त्याला कुणाची काय पर्वा?
तो हवे त्याला तसे वागून गेला

हाशेर मस्तच आहे.

मला वाटते..

मला वाटतेय की 'हेलावून' च्या जागी 'हलवून' असे असावे,म्हणजे वृत्तभंगही टाळता येईल.

नवा मतला!

मी दिलेला मतल्यात काहीतरी बदल झाला आहे.
खाली नवा (मूळ) मतला दिला आहे तोच मतला म्हणून वाचावा.

राख़ आशा,राख स्वप्ने,राख सारे
हुंदका तो या जगा जाळून गेला

चातक

दिलगीर आहे

मला हा बदल फोनवर ऐकवण्यात आला होता आणि तो करण्याचे मी वचन दिले होते. कामामुळे दौ-यावर असल्याने राहून गेले. शेवटचा शेर

राख़ आशा,राख स्वप्ने,राख सारे
हुंदका तो या जगा जाळून गेला

असा आहे.

धन्यवाद वैभव!

वैभव,
धन्यवाद!
दिलगीरी कशाला? तुझी दाद हवी आहे.

चातक

गज़ल

हुंदका साधा तुझा सांगून गेला
भेटणे नाही अता, बोलून गेला

वा ! सहज सुंदर आणि अर्थपूर्ण मतला .

काळ तो ! त्याला कुणाची काय पर्वा
तो हवे त्याला तसे वागून गेला .

वरचा मिसरा उत्तम आहे, सानी मिस-यात वृत्ताच्या बंधनामुळे " तो त्याला हवे तसे वागून गेला " हे जितकं स्पष्ट वाटतं तितकं " तो हवे त्याला तसे वागून गेला " येत नाहीये . विचार करतो .

नेत होते ते तुला ओढून तेव्हा
कोणता तो शाप मज थिजवून गेला
छान

स्वप्न माझे हे असे (अता?) सजते कशाला
व्हायचा तो सोहळा होऊन गेला

वा ! सानी मिसरा विशेष .

शेवटच्या शेरावर बोलून बदल केलाच आहे आपण.