कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
सल जुने कोणीतरी उकरून गेला
बरसला नाहीच तो येऊनसुद्धा
दुर्दशा जवळून न्याहाळून गेला
ऐकले, जे बोलले नव्हतेच तेही
आणि वर निष्कर्षही काढून गेला
एवढी पडझड इथे झाली कशाने?
एक केवळ शब्द तो मोडून गेला
शेवटी रोखून आसू हासताना
ओढ ओहोटीसही लावून गेला
ज्या क्षणी मज जीवनाचे ध्येय कळले
ते म्हणाले, 'पार कामातून गेला!'
राख मिश्किल हासुनी सांगेल माझी
'सुंभ जळला - पीळ पण राहून गेला!!'
प्रतिसाद
ते म्हणाले, 'पार कामातून गेला!'
वा स्वाती. दर्जेदार गझल.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
सल जुने कोणीतरी उकरून गेला
उकरणे आवडले.
बरसला नाहीच तो येऊनसुद्धा
दुर्दशा जवळून न्याहाळून गेला
अरेरे. लगानमधले गाणे आठवले :-) गर्भितार्थानेही उत्तम शेर.
ऐकले, जे बोलले नव्हतेच तेही
आणि वर निष्कर्षही काढून गेला
खरेच असे घडते, छान शेर.
एवढी पडझड इथे झाली कशाने?
एक केवळ शब्द तो मोडून गेला
वा. मोडणे आणि पडझड कसे घट्ट बसले आहे.
ज्या क्षणी मज जीवनाचे ध्येय कळले
ते म्हणाले, 'पार कामातून गेला!'
वा. एखाद्या कार्याला वाहून घेतलेल्या व्यक्तीबद्दल सामान्य लोकांची प्रतिक्रिया अशीच असते. कामातून जाणे आवडले.
राख मिश्किल हासुनी सांगेल माझी
'सुंभ जळला - पीळ पण राहून गेला!!'
म्हणीचा उत्तम वापर. शेवटच्या जागी शेराची उत्तम निवड.
हे असे नक्षत्र 'स्वाती' लागले अन्
तो कसे मोती इथे उधळून गेला
राख माझी.....!!!
जबरदस्त गझल...
'राख माझी'... ह्या शेराला जे सांगायचे आहे ते शंभर गझलेतून प्रकट होणे अवघड.
कायमचा स्मरणात राहील असा शेर.
बाकीची गझल देखील सुंदर आणि सहज.
-आपले आभाळ :)
सुंदर
सुंदरच गझल
ऐकले, जे बोलले नव्हतेच तेही
आणि वर निष्कर्षही काढून गेला
ज्या क्षणी मज जीवनाचे ध्येय कळले
ते म्हणाले, 'पार कामातून गेला!'
राख मिश्किल हासुनी सांगेल माझी
'सुंभ जळला - पीळ पण राहून गेला!!'
हे खासच.
सुधीर
उत्तम गझल.
शेरांना प्रतिसाद देऊन झालेले आहेतच.
गझल उत्कृष्ट! माझे - ;) / :)
गझल
गझल चांगली आहे. अजून सफाई यायला हवी. सलग आलेले लघू बरेच ठिकाणी कानांना खटकताहेत. अधोरेखित केले आहेत.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
सल जुने कोणीतरी उकरून गेला
चांगला.
बरसला नाहीच तो येऊनसुद्धा
दुर्दशा जवळून न्याहाळून गेला
चांगला.
ऐकले, जे बोलले नव्हतेच तेही
आणि वर निष्कर्षही काढून गेला
नेहमीचे पण छान! प्रदीप कुलकर्णी ह्यांचा एक शेर आठवला---
अर्थ आधी काढला अन् बोलणे मागून झाले
जे तुझ्या-माझ्यात झाले गैरसमजातून झाले
एवढी पडझड इथे झाली कशाने?
एक केवळ शब्द तो मोडून गेला
एक साधा शब्द चालेल का? छान शेर.
शेवटी रोखून आसू हासताना
ओढ ओहोटीसही लावून गेला
चांगला. कल्पना मस्त.
ज्या क्षणी मज जीवनाचे ध्येय कळले
ते म्हणाले, 'पार कामातून गेला!'
वरची ओळ बदलावीसे सुचवावेसे वाटते. मज ऐवजी त्याला आले तरी चालेल. खालची ओळ चांगली.
राख मिश्किल हासुनी सांगेल माझी
'सुंभ जळला - पीळ पण राहून गेला!!'
'मिश्किल' हसणे मला आवश्यक वाटले नाही. दुसरे म्हणजे कानांना खटकले. शेर चांगला.
मक्ता
मक्ता आणि त्याआधिचा शेर जास्त आवडले.
'मिश्किल चा श्लेष आवडला. '
हा प्रतिसाद बदलायला हवा. श्लेष म्हणायच नव्हत, चुकून झाल, मिश्किल हा शब्द राख मिश्किल की हासणे मिश्कील असा मोकळा सोडलेला आहे, त्याने आणखी मजा आली असे जाणवले. चू. भू. द्या. घ्या.
आभार, सुचवण्या
अभिप्रायासाठी सर्वांचीच आभारी आहे.
सुचवण्या रास्त आहेत. 'मिश्किल' शब्द हवा आहे मला तिथे, बाकीच्यांवर विचार करत आहे.
प्रदीप कुलकर्णी यांचा शेर खूपच आवडला. तसाच अर्थ किती सहज आला आहे !
विसूनानांनी म्हटल्यावर 'ध्येया'च्या शेरकडे वळून बघताना माझ्याही डोळ्यांसमोर गटण्याचा 'कुठल्या साईजमधे रंगवू साहेब?' विचारणारा पेंटर बाप आला खरा. लिहीताना कसं नाही लक्षात आलं कोण जाणे. :)
'मिश्किल' मधे श्लेष? कसा? असेलच तर तो अनवधानाने झालेला आहे. मी त्याचं श्रेय घेऊ शकत नाही.
सुरेख
मतला आवडला, ध्येय... सुन्दर शेर.
सुंदर !
गझल अतिशय चांगली आहे .मतला मात्र cliche'd वाटतो