कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
आसवांचा जोगवा मागून गेला
नाव वाटे ना कधीही ऐकलेसे
ओळखीचे का तरी वागून गेला
नाद ऐसा लावला सौदागराने
गाव वेशीला उभा टांगून गेला
गारवा लेपूनिया देहास सार्या
काळजा चटका नवा डागून गेला
वाटली डोळ्यांस माझ्या स्वप्न सारी
गात अंगाई स्वत: जागून गेला
प्रतिसाद
आसवांचा जोगवा
गागून अथवा गांगून असा विशिष्ट काफिया घेतला आहे हे ह्या गझलेचे वैशिष्ट्य आवडले. न ऐकलेले नाव आणि ओळखीचे वागणे, तसेच गारवा आणि चटका ह्या जोड्यांतल्या कल्पना खूप आवडल्या.
छान, पण अलामत?
२,३,४ शेर खूप आवडले. शेवटचाही छान आलाय पण "स्वप्न सारी" शब्द खटकतो. कदाचित " स्वप्नं " असे केले तर ठीक वाटेल.
मतल्यात आणि नंतर पुढील गझलेतही अलामत भंगली आहे. "गून" हा काफिया घेतल्याने अलामत स्वर कधी "आ" तर कधी "आं" असा झाला आहे.
-- पुलस्ति.
हाच..
..विचार करत होतो की, हे वैशिष्ठ्य आहे की दोष.
गझल छान आहे. २रा आणि ४था शेर विशेष.
- नचिकेत आठवले
दुरुस्ती?
माझी प्रथम (http://www.marathigazal.com/node/141) प्रवेशिकाही अशीच होती -
जुना मतला-
हुंदका साधा तुझा सांगून गेला
या फुलांच्या शृंखला भंगून गेला
असा होता.
त्यामुळे अलामतभंग होतो असे पर्यवेक्षकांनी सुचवले होते. त्यामुळे बदलून -
हुंदका साधा तुझा सांगून गेला
मख्मली हुंकार ते - तुडवून गेला
असा केला.
पण -
या गझलेत 'आ' आणि 'आं ' असे भिन्न स्वर आल्यामुळे अलामतभंग होत नाही असे वाटते.
पण स्पष्ट नाही.
अलामत
साती,
गझल आवडली. 'ओळखीचे... ' चा शेर आणि काफिये विशेष.
'स्वप्न' थोडं खटकलं मात्र.
विसूनाना,
मला असं वाटतं की 'आ' आणि 'आं' मुळेही अलामत भंग होतेच. अर्थात, माझं असं मत आहे की भंगून, रांगून, इ. गून असलेल्या यमकांमुळे काफिये अधिक तंग होतात आणि त्यामुळे त्या गझलेच्या निर्मितीतला आनंद वाढतो.
अलामत पाळण्याबाबतचा किंवा मतल्यापासून न पाळल्याप्रमाणे प्रथेप्रमाणे सवलत देण्याचा निर्णय मात्र परीक्षकांवर आणि वाचकांवर सोपवूया!
म्हणूनच मी माझ्या गझलेतही २ मतले लिहिले आणि पहिला 'चेहरा हास्यात जे लपवून गेला' असा मिसरा लिहिला. पण दुसर्या मतल्यापासून पुढे 'गून'चं यमक पाळलं.
- कुमार
चांगली आहे.
नाव वाटे ना कधीही ऐकलेसे
ओळखीचे का तरी वागून गेला
गारवा लेपूनिया देहास सार्या
काळजा चटका नवा डागून गेला
हे उत्तम शेर.
पण -
वाटली डोळ्यांस माझ्या स्वप्न सारी
गात अंगाई स्वत: जागून गेला
यात स्वप्न -सारे किंवा स्वप्ने - सारी हवे होते.
दावुनी डोळ्यांस माझ्या स्वप्न त्याचे (असे काहीसे)
गात अंगाई स्वत: जागून गेला
तसेच अलामतीबाबतही शंका आहे.
माझे - ६/१०. चांगली गझल - उत्तम होऊ शकेल अशी.
सुरेख्
मला आवडली गजल्, साती!
नाद ऐसा, गारवा... सुंदर शेर
मक्ता सहीच आहे. माझ्यामते शब्दही बरोबर आहेत. इथे 'स्वप्न' हा शब्द अनेकवचनी आहे - 'स्वप्नं'. बोलताना आपण स्वप्ने म्हणत नाही, स्वप्नं म्हणतो.
साती, बरोबर?
फक्त "वाटली डोळ्यांस.." च्या ऐवजी "वाटुनी डोळ्यांस..." कसं वाटेल? कारण "वाटली डोळ्यांस माझ्या स्वप्नं सारी" इथे वाक्य पूर्ण होतय मग पुढे "अन", किंवा "आणि" हवं पुढचं वाक्य जोडायला (असं वाटतं).
"वाटुनी... " ने सुरुवात केलेला शेर (वाक्य) दुसर्या ओळीत पूर्ण होतो.
मस्तय!
--शलाका
छान
गझल छान आहे, कल्पनांची मांडणी आवडली.
मक्ता तेवढा सफाईदार झालेला नाही.
चटका आणि डाग देणे दोन्ही समानार्थि शब्द आहेत.. हा शेर बदलून कसा लिहीता येईल?
छान आहे
ओळखीचा आणि चटक्याचा शेर मस्त. स्वप्नांची क्ल्पना चांगली आहे पण मांडणी जरा खटकत्ये.