लढाई चालली आहे...

बंडखोरीची धिटाई वाढली आहे
आत्मनिष्ठेशी लढाई चालली आहे...
कत्तली करतात त्यांना मनसबी मोठ्या
संसदेने मोगलाई पोसली आहे...
हिंडण्या रस्त्यावरी ना भय कुणाचेही
(पोलिसांची दांडगाई थांबली आहे!)
हिरवळीवर सांसदांच्या चालल्या पार्ट्या
कोण म्हणते पेशवाई लोपली आहे!
जायचे तेथे स्वतःची बिसलरी न्यावी
जाल तेथे रोगराई माजली आहे...
बंद झाली अन्नछत्रे ज्ञानदात्यांची
जाणकारांनी सराई थाटली आहे...
वेदनांचे काव्य वाचुन हे म्हणाली ती
कागदावर फक्त शाई सांडली आहे...
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
क्या बात है ?
हिरवळीवर सांसदांच्या चालल्या पार्ट्या
कोण म्हणते पेशवाई लोपली आहे!
शेर मस्त जमलाय प्रसाद
आहे मनोहर तरी...
चांगली आहे पण ...
काळजाला भिडली नाही - धुके आणि भास सारखी...
कदाचित माझ्या पिंडाची नसावी म्हणून.
वेदनांचे काव्य वाचुन हे म्हणाली ती
कागदावर फक्त शाई सांडली आहे...
हा शेर मात्र जाणवला.
वा!सामाजिकतेला स्पर्शून जाते गझल...
वेदनांचे काव्य वाचुन हे म्हणाली ती
कागदावर फक्त शाई सांडली आहे...
हे थेट मनाला भिडलं...
ही जुल-काफिया गझल आहे का?
वा!
-वा प्रसाद, छान आहे गझल तुमची.
मतला आणि मक्ता दोन्ही विशेषच आवडले. मक्त्यामधे व्यक्त झालेली बेपर्वाई, कोरडी अलिप्तता ही मला तरी प्रातिनिधिक वाटली - 'ती म्हणाली' असं म्हटलं आहे तरी.
-सतीश
कोणी सांगेल?
मनसबी म्हणजे काय?
बंद झाली .. शेर कळला नाही.
मनसबी
माझ्या माहितीप्रमाणे मोगलाईत सरदारांना दिल्या जाणार्या वार्षिक तनख्वाहला मनसब म्हणत असावेत. शिवाजी महाराज औरंगझेबाला भेटायला आग्र्याला गेले तेव्हा त्यांना पंचहजारी मनसबदारांच्या ओळीत उभं केलं होतं असं वाचल्याचं आठवतंय.
सराई म्हणजे तात्पुरते रहाण्याची सोय. सहसा धर्मशाळा या अर्थी हा शब्द वापरलेला ऐकला आहे. या शेराचा अर्थ मलाही नीटसा उमगला नाही.
मनसब...
बरोबर, दरबाराने दिलेली वार्षिक तनखा म्हणजे मनसब. मोगलाईमधे अशा मनसबींची रक्कम अथवा सम्मान त्या त्या सरदाराच्या पराक्रमावर (म्हणजे किती हिंदुंच्या कत्तली केल्या वा धर्मांतर केले!) या वर अवलंबून असायच्या...
मी हा शेर मात्र एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला (ज्याचा एका मोठ्या धार्मिक दंगलीत सहभाग / नेतृत्व होत) ज्या प्रकारे मान मरातब देऊन अक्षरशः स्टार बनवलं जात आहे त्या संदर्भात लिहिला आहे... अर्थातच या व्यक्तीच्याच नाही तर इतर अनेक आमदार / खासदारांच्या बाबतीतही हा लागू होतो हे आपलं दुर्दैव...
मनसब म्हणजे चराऊ कुरण :)
प्रसाद, याच विषयाची एक थेट गझल मी लिहिली आहे.
लवकरच देईन इथे.
वा!
गझल खूप आवडली प्रसाद!
मतल्यातला सानी मिसरा जरा पुस्तकी आणि अस्पष्ट वाटला आणि अन्नछत्रे मलाही नीट समजला नाही.
हिरवळ, बिसलरी आणि मक्ता फार फार आवडले!!
-- पुलस्ति.
मतला आणि मक्ता
मतला आणि मक्ता विशेष आवडले.
- परीवश
वा !
प्रसाद,
आवडली गझल.
(वर एका प्रतिसादात उल्लेख केल्याप्रमाणे 'अन्नछत्रांचा' शेर मात्र नीटसा कळला नाही.)
सराई
अन्नछत्र = free boarding / food
सराई = paid lodging + boarding / food
या शेराचा शब्दशः अर्थ असा: ज्यांच्याजवळ ज्ञान आहे अशा काही लोकांनी ते फुकट वाटण्यासाठीची अन्नछत्रं (free classes)काढली होती... जी आता बंद पडली... आणि आता जे जाणकार (उपरोधिक अर्थाने) आहेत त्यांनी सराया (paid workshops!) चालू केले आहेत...
(आता हे कुठल्या क्षेत्रात घडलं... कुठे घडलं आणि मुख्य म्हणजे का घडलं हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा आणि interpretation चा प्रश्न!! )
मला कळलेला अर्थ : 'Atlas Shrugged'
'Atlas Shrugged' मराठी गझलेत उतरवण्याचा स्तुत्य प्रयत्न.
पण थोडा आडपडद्याने!
आता पहा,
कत्तली करतात त्यांना मनसबी मोठ्या
संसदेने मोगलाई पोसली आहे...
दोन अर्थ :
१. मोठ्या कत्तली त्याना मनसबी करतात -
मोठ्या कत्तली करून ते मनसबदार बनतात
सांसद हे कत्तली करूनच त्यांच्या -त्यांच्या मतपेटीचे मनसबदार झाले आहेत,
त्यांच्या -त्यांच्या चराऊ कुरणावर चरत आहेत.
किंवा
२. मनसबी कत्तली त्याना मोठ्या (की मोठे?) करतात -
चराऊ कुरणे वाटून केलेल्या गुणवत्तेच्या कत्तली त्यांना मोठ्या करतात.
संसदेने मोगलाई पोसली आहे.
कोणता बरोबर आहे प्रसाद?
प्रसाद, इतके काही लपवण्याचे कारण नव्हते.
याच विषयाची एक थेट गझल मी लिहिली आहे.
लवकरच देईन इथे.
चलो.
आभार
विसुनाना धन्यवाद!
Atlas Shrugged फारच मोठं आहे हो... (आकारानी आणि मानानीही!) इतकं काही मोठं सांगायचं नव्हतं या गझलेतून...
तुमच्या थेट गझलेची मात्र वाट बघत आहे... लवकर येउ द्या!
प्रसाद...
वा...
प्रसादशेठ,
एकदम दमदार सामाजिक गझल.. अभिनंदन..
आमचा अजून एक प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार.
मस्त
प्रसाद.......मस्तच!
वेदनांचे काव्य वाचुन हे म्हणाली ती
कागदावर फक्त शाई सांडली आहे...
हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
वा!!
प्रसाद,
मस्त आहे गझल... आवडली!!!
शेवटच्या शेरावरून, फार पुर्वी तू लिहीलेल्या दोन ओळी आठवल्या. :-)
"गझलेस माझ्या, जन्मण्याची जाहली घाई जराशी"असे काहीसे होते. दुसरी ओळ नीटशी आठवत नाहीये पण शेवट "... कागदावर सांडली शाई जराशी" असा स्मरतो आहे.
पुन्हा एकदा, वा!!!
- नचिकेत
दोन काफिये
वा प्रसाद,
सुंदर गझल... वा! वा! वा!
बंडखोरीची धिटाई वाढली आहे
आत्मनिष्ठेशी लढाई चालली आहे... हा मतला आणि मोगलाई, पेशवाई, शाई इ. सगळेच शेर आवडले.
यात धिटाई, लढाई, शाई, इ. काफिये आणि चालली आहे, वाढली आहे, पोसली आहे इ. काफिये आहेत; मला वाटतं याला 'जुल-काफिया' म्हणतात.
अशी तांत्रिक क्लिष्टता असूनही गझल अगदी सहज्-सुंदर झाली आहे.
- कुमार
आवडली!
तुम्ही शाई देखील एवढी सुरेख सांडता आणि त्याची सुंदर गझल होते. :)
छान आहे.
चिन्नु
गझल्
गझल आवडली, मक्ता खूप छान आहे.
अगदी बरोबर
अगदी बरोबर कुमारजी..ही जुल-काफिया(द्विकाफिया) गझल आहे.
असेही असते काय?
ही गझल जुल्-काफिया आहे हे समजले.
जादुगारसाहेब, अजून या पोतडीत काय काय आहे?
खूपच छान. माझ्यासारख्या हरितशिंग्यांना नवे गवत! :)
वा!!!
अप्रतीम गझल!!! मजा आ गया!!! सगळेच शेर खास! आवडले!!!
शेवटच्या शेरात पहिल्या ओळीत बदलाला थोडी जागा जाणवली...
वेदनांचे काव्य वाचुन बोलली मज ती
कागदावर फक्त शाई सांडली आहे...
असं काहीसं कसं वाटेल?
व्वा!
पुन्हा वाचली..
अगदी खणखणीत पोचली..
वेदनांचे.. चिन्नू अगदी मनातलं बोललीस.
बंद झाली.. शेरात, जाणकारांनी (!) किंवा आणखीन काही चिन्ह सटायर व्यक्त करायला नाही का?
बरोबर,
बरोबर, दरबाराने दिलेली वार्षिक jade तनखा म्हणजे मनसब. मोगलाईमधे अशा मनसबींची रक्कम अथवा सम्मान त्या त्या सरदाराच्या पराक्रमावर (म्हणजे किती हिंदुंच्या कत्तली केल्या वा धर्मांतर केले!) या वर अवलंबून असायच्या...मी हा शेर मात्र एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला (ज्याचा एका मोठ्याsapphire ring धार्मिक दंगलीत सहभाग / नेतृत्व होत) ज्या प्रकारे मान मरातब देऊन अक्षरशः स्टार बनवलं जात आहे त्या संदर्भात लिहिला आहे... अर्थातच या व्यक्तीच्याच नाही तर इतर अनेक आमदार /belly button rings खासदारांच्या बाबतीतही हा लागू होतो हे आपलं दुर्दैव...
प्रतिसाद
माक्ता आवडला. शेरही छान जमले आहेत. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याही गजला वाचा व प्रतिसाद द्यावा.
प्रकाश क्षीरसागर