२५ : अश्विनी

हुंदका साधा तुझा सांगून गेला
की जगीचा न्याय या संपून गेला

अंतरीचा वेध घेती शुष्क डोळे
आसवांचा ओघही आटून गेला

जन्म घेणे हाच जेथे दोष ठरला
भेटला जो, तो सजा सांगून गेला

पोळलेले पाय, रस्ते तापलेले
हात फैलावून जीव शिणून गेला

प्रश्न जो तू ना कधीही मांडलेला
हृदय माझे थेट चिरफाळून गेला

कोवळे शैशव तुझे जपता न आले
डंख साऱ्याजीवनात भिनून गेला

प्रतिसाद

जन्म घेणे

जन्म घेणे हाच जेथे दोष ठरला
भेटला जो, तो सजा सांगून गेला -उत्कृष्ट कल्पना .

पोळलेले पाय, रस्ते तापलेले
हात फैलावून जीव शिणून गेला

प्रश्न जो तू ना कधीही मांडलेला
हृदय माझे थेट चिरफाळून गेला
- चांगला उला मिसरा, सानी मिसरा तासायला हवा.

वेध घेती शुष्क डोळे
आसवांचा ओघही आटून गेला
- आसवांचा ओघ पुन्:पुन्हा वाचल्यामुळे जुना वाटत असला तरी ठीक.

मतला, मक्ता ठीक. गझल चांगली.
माझे - ६/१०.

चांगली जमली आहे...

विसूनानांशी सहमत...
-आपले आभाळ :)

आनंदयात्री's picture

गझल मीटर

गझल मीटर मध्ये आहे, पण मक्त्याचा सानी मिसरा वाचताना धडपडायला होतंय...
चुभूद्याघ्या...

आसवांचा ओघही आटून गेला

अंतरीचा वेध घेती शुष्क डोळे
आसवांचा ओघही आटून गेला
आवडले

जन्म

जन्म आणि प्रश्न शेर खूप आवडले!
पोळलेले - उला मिसरा इतका मस्त आलाय, पण सानी मिसर्‍याचा संबंध नीट कळला नाही.
-- पुलस्ति.

धन्यवाद

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!

विसुनाना, तुम्ही फारच उदार आहात. :)

आनंदयात्री, मक्त्याचा सानी मिसरा लिहीताना मला सुद्धा धडपडायला झाले होते. :)

पुलस्ति, तापलेल्या रस्त्यांवर, पोळलेले पाय घेऊन जी छोटी अभागी मुले, एका वेळेच्या अन्नासाठी हात पसरवून भीक मागत असतात, त्यांच्यासाठी तो शेर आहे. :(

अप्रतिम

अप्रतिम गझल.

हात फैलावून.. मधे जीव शिणून वाचताना लय गडबडते.
मक्त्यातही.
पण प्रत्येक शेर सुंदर लिहीलाय.