१३ : पुलस्ति

हुंदका साधा तुझा सांगून गेला
धुंद तो कैफात जे बोलून गेला

लोटली गर्दी घरी या पाहुण्यांची
नेमका 'तो' यायचा राहून गेला

छंद त्याला भावनांशी खेळण्याचा
हासुनी हळुवारसे टाळून गेला

आज भासे रूप माझे आगळेसे
रंग पार्‍याचाच का बदलून गेला?

वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला!

मी निराकारी व्यथा सांगू कुणाला?
भक्त माझ्याशी पुन्हा भांडून गेला

रक्त त्याचे थंड, उसळेना मुळीही
सभ्यतेचे कातडे ओढून गेला!

कोरड्या खार्‍या खुणा ठेऊन गेला
शोध अश्रू जो तुला ढाळून गेला

माणसांची वोळखोनी लायकी तो
वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!

प्रतिसाद

वा!!

लयी भारी हो पुलस्ति...... गझल जाम आवडली...
मक्ता म्हणजे कहर आहे!!
मंद वारा,पार्‍याचा रंग हे सुद्धा आवडले.
शुभेच्छा :)
--आभाळ :)

उत्तम आहे.

छंद त्याला भावनांशी खेळण्याचा
हासुनी हळुवारसे टाळून गेला

वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला!

माणसांची वोळखोनी लायकी तो
वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!

हे नवे, उत्कृष्ट शेर आहेत.

कोरड्या खार्‍या खुणा ठेऊन गेला
शोध अश्रू जो तुला ढाळून गेला

कल्पना चांगली पण मला अर्थ स्पष्ट कळला नाही.
बाकीचे चांगले आहेत पण जुने.
गझल उत्कृष्ट. माझे - ८/१०.

नचिकेत's picture

वाहवा!!!

पुलस्ति,

छान जमून आली आहे गझल.

वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला!

माणसांची वोळखोनी लायकी तो
वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!

हे खासच!!!

एक शंका आहे. "मी निराकारी व्यथा" मध्ये "मी निराकारी" की "व्यथा निराकारी " अशी ambiguity आहे ती जाणून बुजून ठेवली आहे का? "मी निराकारी" म्हटले तर अर्थ लागतो आहे शेराचा.

- नचिकेत आठवले

निराकारी

मीही निराकारी आणि व्यथाही निराकारी आहे नचिकेत. पण तुमचे म्हणणे मला पटले - "मी निराकारी" असे धरले तर अर्थ जास्त स्पष्ट आणि लवकर लागतो...
-- पुलस्ति.

वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!

गझल आवडली.

लोटली गर्दी घरी या पाहुण्यांची
नेमका 'तो' यायचा राहून गेला
छंद त्याला भावनांशी खेळण्याचा
हासुनी हळुवारसे टाळून गेला
वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला!
हे आवडले.

माणसांची वोळखोनी लायकी तो
वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!
वा. खूप आवडले.

पुलस्ति,

छान आहे गझल तुमची.
काही शेर खूप आवडले, त्यांच्याबद्दल मनापासून अभिनंदन!

लोटली गर्दी घरी या पाहुण्यांची
नेमका 'तो' यायचा राहून गेला

छंद त्याला भावनांशी खेळण्याचा
हासुनी हळुवारसे टाळून गेला

आणि हा तर खूपच छान आहे.

वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला!

आनंदयात्री's picture

लोटली

लोटली गर्दी घरी या पाहुण्यांची
नेमका 'तो' यायचा राहून गेला

खूप आवडला... :)

कुमार's picture

सुंदर

पुलस्ति,
गझल आवडली.
'मंद वारा नेहमी झोंबून गेला'...सुंदर.
माणसांची वोळखोनी लायकी तो
वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!
- अप्रतिम मक्ता आहे. 'वोळखोनी' हा शब्दप्रयोगही अतिशय आवडला.

- कुमार

रसिक's picture

मक्ता

मक्ता सुरेख ! गझल आवडली.

मस्त गझल

वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला!

माणसांची वोळखोनी लायकी तो
वेद रेड्याच्या मुखे वदवून गेला!

हे शेर तर खासच आहेत.
'अश्रू तुला ढाळून गेला' ही कल्पनाही मस्त आहे.

मला 'आगळेसे' मात्र खटकलं.
भासते प्रतिबिंब हे आता निराळे
किंवा
रूप (बिंब?) का माझे मलाही ओळखेना
असं काहीसं जास्त सहज वाटेल का?
तसंच 'रक्त उसळेना मुळीही' या शेरात काळाची गडबड वाटते आहे का?
रक्त त्याचे उसळले नाही कधीही
असं केलं तर?

रूप आणि रक्त

स्वाती,
रूप आणि रक्त शेरांबद्दल तुमची शंका रास्त आहे... पण

रूप - मला खरच बिंब म्हणायचं नाहिये. बिंब म्हणताना "ते रूपाहून भिन्न असते" ही जाण गृहित असते. मला म्हणायचे ते असे -
मला माझी ओळख होते ती या पार्‍यांमुळेच (इतर माणसे, घटना, परिस्थिती इ.) या "बाह्य" संदर्भामधूनच मी माझा "आतल्या"बद्दल अदमास लावतो. मग जर आज मला मी वेगळा वाटत (चांगल्या वा वाईट अर्थाने) असेन तर तो खरच माझ्या"तला" बदल आहे की या "संदर्भा"मधला बदल आहे?
कदाचित "आगळेसे" ऐवजी "वेगळेसे" वापरले असते तर जास्त योग्य झाले असते का?

रक्त - काळाची गडबड "उसळेना" आणि "ओढून गेला" मुळे वाटतेय का? पण "आम्ही पिकनिकला गेलो. स्टोव्ह काही केल्या पेटेना! मग आम्ही दूध गारच पिऊन घेतले" - असे संवाद आपण करतोच की. तुम्हाला काय वाटते?

-- पुलस्ति.

वेगळेसे

'आगळेसे'पेक्षा नक्कीच अधिक सुस्पष्ट आहे, पण माझा प्रश्न तो नव्हता. मला हा 'से' (उदा : हळुवारसे) शेराच्या सहजतेला बाधा आणतो असं वाटतं. (तुम्हाला 'कैसे/कैसी' खटकतं तसंच.) :)
शेर आहे तसाही छानच आहे. अर्थ सुंदर.

पिकनिकचं उदाहरण मात्र पटलं नाही. :) त्यात मागेपुढे बरीच वाक्य काळ निश्चित करायला असतात, म्हणून एखादं असं वाक्य ओघात खपून जातं. नाही?

पुन्हा एकदा : सगळ्याच शेरांचे अर्थ आत्ताही पोचत आहेतच आणि छानच आहेत. पण शब्दरचना आणखी सहज होऊ शकेल असं माझं मत.

से

ओह.. आता आलं लक्षात. सॉरी, माझा गैरसमज झाला होता. उगाचच लांबलचक स्पष्टीकरण देत बसलो...
तुमचे दोन्ही मुद्दे पटले! सहजता आणि काळ हे लक्षात ठेवायचा नक्की प्रयत्न करीन. माझे "कैसी" बद्दलचे मत "कैसे" तुमच्या लक्षात"से" राहिले :):)
-- पुलस्ति.

व्वा पुलस्ति

वादळांसाठी ..
मी निराकारी..
रक्त त्याचे ..
अप्रतिम!
मतला..हं.. विचार करतेय.
मक्त्यात मला उगाच लायकीच्या जागी दुसरा शब्द घेउउन वाचावसं वाटलं..

लायकी

लायकीचा शेर जबरदस्त आहे . त्यातही "वोळखोनी" वापरण्याचे प्रसंगावधान काबिले तारीफ . मंद वारा झोंबून गेला हा ही विशेष शेर . आगळेसे मला आक्षेपार्ह नाही वाटले .

रक्त त्याचे थंड , उसळेना मुळीही
सभ्यतेचे कातडे ओढून गेला

हा शेर मात्र "मला" अस्पष्ट वाटला. नक्की कमतरतेवर बोट ठेवता येईल की नाही संभ्रम आहे पण प्रयत्न करतो .

सभ्यतेचे कातडे "ओढून " "गेला" अशी वाक्य रचना आल्यामुळे तो कुठे (तरी) गेला (रणांगणी?) असे येणे गरजेचे वाटले . किंवा सभ्यतेचे कातडे ओढून "जगत" गेला असे येणे अपेक्षित असले तरीही ते येत नाहीये . अं... ह्या पुढे सांगता नाही येत आहे. सुचलं तर मेल करेन पण तोपर्यंत एकदा विचार करणार का?

धन्यवाद

ओढून

ह्म्म... बहुतेक तुमचं म्हणणं लक्षात येतंय "ओढून गेला" बद्दल. विचार करतो. तिथे तुम्ही म्हणताय तसे "जगत गेला" - नव्हे "दरवेळी जगत गेला" - असे असावे असे वाटत राहते. आणि "दरवेळी जगत" अर्थातच गृहीत धरता येत नाहिये.. :(
-- पुलस्ति.

धन्यवाद

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
-- पुलस्ति.