कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
अब्द शब्दांमागचे बोलून गेला
'सोसण्यासाठीच आहे जन्म, बाई'
भेटला तो हेच हे ठासून गेला
जाहले आहे मुके वन पाखरांचे
जाळणारा स्वर, ऋतू बरसून गेला
एरवी रेंगाळणारा सावळा घन
ध्वस्त माती एकटी टाकून गेला
भोगुनी भूमीस कर्मदरिद्र मानव
तारकांची अंगणे उकरून गेला
'गाळुनी दु:खास प्या हो जीवनाला'
कोण हा वेडा अता बरळून गेला
तो कलंदर जाहला वेडा कसा, जो
अर्थ आयुष्यातला उकलून गेला?
'ह्याचसाठी का उधळला जीव होता?'
खंत हौतात्म्यातली बोलून गेला
हे बरे झाले फिरकले ना तिथे मी
पिंड माझा कावळा उचलून गेला
प्रतिसाद
'सोसण्यासाठीच आहे जन्म, बाई'
सुंदर गझल.
'सोसण्यासाठीच आहे जन्म, बाई'
भेटला तो हेच हे ठासून गेला
वा.
एरवी रेंगाळणारा सावळा घन
ध्वस्त माती एकटी टाकून गेला
आवडले.
'ह्याचसाठी का उधळला जीव होता?'
खंत हौतात्म्यातली बोलून गेला
वा. वा. फार फार आवडला.
सहमत आहे...
एकंदर गझल छानच, पण हे शेर विशेष आवडले.
- नचिकेत आठवले
वा!
शलाका - गझल आवडली!
"अब्द" म्हणजे काय? खूप उत्सुकता लागून राहिली आहे..:)
ऋतू, तारका - नीट कळले नाहीत. घन - ठीक.
कलंदर, हुतात्मा, बाई आणि पिंड - अप्रतिम! हे शेर (आणि त्यांच्यामुळेच गझल) खूप आवडले..
-- पुलस्ति.
हुंदका
हुंदका साधा तुझा सांगून गेला
अब्द शब्दांमागचे बोलून गेला
- सर्वोत्तम मतला.
हे बरे झाले फिरकले ना तिथे मी
पिंड माझा कावळा उचलून गेला
तो कलंदर जाहला वेडा कसा, जो
अर्थ आयुष्यातला उकलून गेला?
- उत्तम
जाहले आहे मुके वन पाखरांचे
जाळणारा स्वर, ऋतू बरसून गेला
'गाळुनी दु:खास प्या हो जीवनाला'
कोण हा वेडा अता बरळून गेला
-चांगल्या कल्पना. पण शद्ब?
बाकीचे जुने किंवा बरे.
गझल अत्युत्तम होऊ घातलीच होती, पण अजून जरा दम धरायला हवा होता असे वाटले.
गझल चांगली आहे.
माझे - ७/१०.
दाद!!! पुन्हा पुन्हा दाद!!
छान!! आवडली गझल.
'अब्द' म्हणजे काय हे कोणीतरी सांगावे Please. कारण असा नाविण्यपूर्ण मतला कार्यशाळेत पहिल्यांदाच वाचलाय.
तारकांचे अंगण उकरणे, वेड्याचे 'दु:ख गाळून जीवनाला पिणे'- बरळणे. जबरदस्त!!
मक्ता तर केवळ Great!!
नानांशी सहमत. गझल अत्त्युत्तम झाली असती..झालीच होती जवळजवळ..पण...
-आपले आभाळ :)
क्या बात
क्या बात है!
मक्त्याच्या आधीचे तीन शेर अप्रतिम.
गाळुनी तर व्वाच!
जाहले आहे.. मधे सीतेला वनवासात सोडणे आठवले.. पण नीट कळला नाही.
मक्ता .. गोंधळ झाला आहे (अर्थात माझा)
भोगुनी .. मधे माणासाने आकाशालाही..? नाही कळलं नीट.
मतल्यात अब्द?
२, ४, शेवटून
२, ४, शेवटून दुसरा शेर आवडले.
अब्द ह्या शब्दाचा अर्थ माहिती असूनही मतल्याचा अर्थ स्पष्ट झाला नाही(अब्द ह्या शब्दाचा मेघ असा अर्थ माहिती आहे दुसरा असेल तर खुलासा करावा)
३,५ नसते तरी चालले असते.
आज प्रकाशित झालेल्या गझला वाचून काहि वेगळे वाचल्याचा आनंद झाला. परीक्षकांच्या मदतीशिवाय जर ह्या मूळ स्वरूपातच अशा असतील तर पहिल्या तीन क्रमांकासाठी चढाओढीत वर आहेत हे वेगळे सा.न्गायला नको.
वा!
वा!
सुंदर गझल..
'सोसण्यासाठीच आहे जन्म बाई' - ... संगीता जोशींच्या गझलांची आठवण झाली.
खंत हौतात्म्यातली, अर्थ आयुष्यातला.. इ. शेरही आवडले.
- कुमार
दोन शब्द- माझेच
सगळ्यांचे आभार. गजल वाचून, त्यावर विचार करून, काही परत कळवण्याबद्दल, खरच!
अब्द - मला माहीत असलेला अर्थ (अर्थ छटा?) - "आभाळाइतके खूप खूप"
जाहले आहे- पाखरांचे कंठ (स्वर) जाळणारा ऋतू बरसून गेला. विसूनानांचं खरय. इथे शब्दात मार खल्लाय.
भोगुनी- माणसाने आपल्या दरिद्री कर्माने भूमी (प्रुथ्वी) भोगून झाल्यावर आता आकाशस्थ तारकांकडे झेप घेतोय - तिथेही भोगण्याचीच कर्मदरिद्री व्रूत्ती बरोबर घेऊनच.
-- शलाका
सुंदर
छान आहे गझल
त्यातही "सोसण्यासाठीच" आणि "हौतात्म्य" हे शेर आवडले
दाद राव
पहिले कडवे
>>>हुंदका "साधा" तुझा सांगून गेला यातच तो बरेच काही (आभाळ बिभाळ )बोलून गेला असे येते आहे असे वाटले. पुन्हा खालची ओळ का आली समजले नाही. खाली कारण किंवा प्रतिक्षिप्त क्रिया येणे आवश्यक आहे का? अब्द म्हणजे मेघ हे शिकल्याचे आठवते . समजावून सांगा.
दुसरे कडवे
>>> हेच हे नंतर ठासून आलेला आवडला बरें.
तिसरे कडवे
>>> अवघड आहे. समजला नाही.
चौथे कडवे
>>>
छान छान
पाचवे कडवे
>>> बरें. पहिली ओळ म्हणताना लय बिघडली
सहावे कडवे
>>>बरें बरें
सातवे कडवे
>>> जाहला वेडा कसा म्हणजे तो कसा वेडा ठरला असे म्हणायचे असेलच तर समजले. नसेल तर सांगा.
आठवे कडवे
>>> विचार स्तुत्य आहे. पण खालच्या ओळीत कोण बोलून गेला (हुतात्माच पण तो तिथे ओळीत नसल्याने खंत कर्ता करविता होतोय असे वाटले) अस्पष्ट आहे.
नववे कडवे
>>>समजले नाही.
१,३,७,८,९ समजावून सांगा . मी ढ आहे.
ढ?
ढ राव,
आपलं नाव आवडल!
गजल वाचून त्यावर प्रश्नही विचारलेत, त्याबद्दल thanks! माझ्यापरीने तुमच्या प्रश्नांची उत्तर -
पहिले कडवे: दुसर्या ओळीत normally कारण येईल पण तेच येणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. इथे दुसरी ओळ पहिलीचा अर्थ अधिक गहन करते. कारण काय असावं हुंदक्याचं? माहित नाही - पण साधा हुंदका बरंच बरंच काही सांगून गेला.
तिसरे: पाखरांचे स्वर जाळणारा ऋतू बरसून गेला त्यामुळे वन मुकं झालं आहे.
पाचवे: तुम्ही म्हणून बघताना लय बिघडली? शक्यता आहे!
आठवे: बरोब्बर! हुतात्माच, तो!
नववे: एखाद्या आत्म्याची इच्छा अत्रुप्त (यातला त्रु कसा लिहायचा?) राहिल्यास त्याच्या पिंडाला कावळा (कावळ्याच्या रूपात आत्मा?) शिवत नाही हा समज आहे. हा मेलेला 'मी' म्हणतो, की बरं झालं मी (आत्मा) तिथे गेलोच नाही.... (काही अर्थं असे निघतात)-
-- माझ्या इच्छांपायी कावळा पिंडाला शिवलाच नसता- माझ्या इच्छा कुणाला कळल्याच नाहीत
-- नातलगांना तरी समाधान की, आत्मा मुक्त झाला सगळ्या इच्छांतून. पण खरच झाला का?
-- realised की, एकूण हा विधीच निष्कारण आहे. आत्मा असा येत नाहीच!
thanks!