आसवे गळती किती? [मुसलसल गझल]

दोन पुतळे म्लान त्यांचे चेहरे दिसती किती?
पंचधातू संगमरमर आसवे गळती किती?
एक गांधी त्यात होते सांगती दुस-यास ते
आपणा केले उभे का? प्रश्न हे छळती किती?
भोवताली मद्य विक्री मास ही विकते इथे
हेच का फळ मम तपाला? भावना सलती किती?
देवळे मशिदी कशाला भांडती हे ना कळे
पाठ माझे अंहिसेचे खिजवुनी हसती किती?
संसदे मध्ये कशाला टांगली तसवीर हो?
भूल थापा घोषणांची भोवती चलती किती?
थांबले आंबेडकरही दु:ख अपुले सांगण्या
खूप पुतळे गाव शहरी, लोक ते बघती किती?
जाहलो मी अडथळा का? वर्दळीमघ्ये असा?
नाळ जुडली मम धुळीशी श्वास अडखळती किती?
हटवूनी मायावती मज आपुल्या पुतळ्यास ती
चौथरे बांधील, तिजला नेहमी भरती किती?
व्यर्थ मी जन्मास आलो खूप लवकर वाटते
हार नोटांचे अताशा पाहतो मिळती किती?
छेडले पुतळ्यास माझ्या दुर्जनांनी जर कधी
डोंब उसळे दंगलीचा झोपड्या जळती किती?
का मला ठऊक नाही? कोण वापरते मला
शांत बघतो निर्बलांना धेन्ड ते छळती किती?
चल जरासे विट्ठलासम वीट घे राहू उभे
निर्विकारी शांत असता लोक ते भजती किती?
हे बरे निशिकांत केले राखला छोटेपणा
बाद मरणाच्या अधीही यातना टळती किती?
निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा