कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला -
'श्वास शब्दांचा जरा थांबून गेला.'
जो विदूषक मीच भिंतीत चिणलेला
हासण्याची लक्तरे टांगून गेला.
ज्या तुझ्या भासासवे मी जगत गेलो
तोच उंबरठ्यास ओलांडून गेला.
तू चषक भरलास ओठांचा तुझ्या अन्
तो रित्या पेल्यापरी सांडून गेला.
सरळ-साध्या जीवनाची मागणी ती,
जीवेघेणे द्दूत तो मांडून गेला.
पाहिले प्रतिबिंब मी अंधारलेले...
आरश्याशी चेहरा भांडून गेला.
काय नशिलेपण तुझ्या गज-यात होते!
श्वास घेता जन्म गंधाळून गेला!
ती नजाकत भावनांच्या पैंजणांची...
का व्यथांचा ताल किंचाळून गेला?
का तुलाही साक्ष देऊ चांदण्यांची?
चंद्र तो दारात रेंगाळून गेला.
मी कुठे केलाच सौदा जीवनाचा?
'भाव' माझा 'तो' तरी सांगून गेला.
तो तसाही कोरडा पाऊस होता,
पापणीला आसवे बांधून गेला.
तो तुझ्या पाठीत चटका ज्ञानदेवा...
चूल विझलेली पुन्हा रांधून गेला!
प्रतिसाद
दोन शेर
-आभाळ,
ती नजाकत भावनांच्या पैंजणांची...
का व्यथांचा ताल किंचाळून गेला?
का तुलाही साक्ष देऊ चांदण्यांची?
चंद्र तो दारात रेंगाळून गेला.
हे दोन शेर आवडले.
-सतीश
झकास रे!
झकास रे! detailed प्रतिक्रिया निवांत देइन!
छान.
ज्या तुझ्या भासासवे मी जगत गेलो
तोच उंबरठ्यास ओलांडून गेला.
ती नजाकत भावनांच्या पैंजणांची...
का व्यथांचा ताल किंचाळून गेला?
हे आवडले.
"जो विदूषक मीच भिंतीत चिणलेला" इथे लयीत वाचताना अडखळायला होते आहे असे वाटले.
पु.ले.शु.
- नचिकेत आठवले
छान
आभाळासारखी छान गझल आहे.
छान!
गझल आवडली.
मतला - "शब्दांचा श्वास" विचार करायला लावणारा आहे. interesting..!
विदूषक आणि नशिलेपण - वाचताना अडखळायला होते. नशिलेपण - "नशीलेपण" असे हवे का?
"तू चषक भरलास ओठांचा तुझ्या अन" - मधे "तुझ्या" ऐवजी "तुझा" हवे असे वाटते..
पैंजणे - कळला नाही. मक्ता - नीट कळला नाही पण तरीही आवडला!
आरसा, भाव, पाऊस - हे शेर छान आलेत!
शुभेच्छा!
-- पुलस्ति.
चांगली आहे.
सारेच शेर कल्पनांच्या दृष्टीने चांगले.
ती नजाकत भावनांच्या पैंजणांची...
का व्यथांचा ताल किंचाळून गेला?
का तुलाही साक्ष देऊ चांदण्यांची?
चंद्र तो दारात रेंगाळून गेला.
हे उत्कृष्ट!
जो विदूषक मीच भिंतीत चिणलेला
:मीटर? नाही बसत.
काय नशिलेपण तुझ्या गज-यात होते!
: काय नशीलेपण आणि गजर्यात पाहिजे. मुद्राराक्षस!
विदुषक चांगला रंगावा पुन्हा! कल्पना तुमची आहे.
माझे - ७.५/१० . पूर्ण निर्दोष असती तर...
सर्वांचेच
सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद :)
विसूनाना... १० पैकी ७.५ म्हणजे फारच झाले हो... :) का ते १०० पैकी ७.५ आहे ??
अभिप्रायात ७.५/ १०० आहे ,म्हणजे नापास :( ??
पूर्ण निर्दोष असती तर..??
विदूषकाच्या शेरामध्ये लयदोष आहे... पण मीटर मध्ये गडबड नाही.
'जो विदूषक मीच भिंतीत चिणलेला' इथे 'भिंतीत' मधला 'त' आणि 'चिणलेला' मधला 'चि' अश्या दोन लघुचा एक गुरू केला आहे म्हणून हा दोष... though it is not good practice :(
पण दुसरा शाब्दीक उपाय सापडला नाही म्हणून तसे करावे लागले.पुन्हा नीट करायचा यत्न करेनच. :)
'नशिलेपण' हे 'नशीलेपण' असेल असं वाटत नाही.जाणकारांनी थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.
मक्त्यात उला मिसरा थोडा अस्पष्ट आहे. 'पाठीत चटका' असे असल्याने...
माणसाच्या सोसण्याची अत्युच्च पातळी दाखवायची होती ह्या शेरातून.
गझलेवर पुन्हा एकदा फिनींशिंग करायले हवे होते असं आता वाटतंय...
असो.
सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद आणि आभाळभर शुभेच्छा :)
--आपले आभाळ.
चुकून शून्य
जास्त पडले होते. ते काढले आहे. :)
मस्तच रे आभाळ !
मस्त जमलीये दोस्ता !
सौदा... खूपच आवडला !
साक्ष चान्द्ण्यान्ची... सहि ये सही !
वा!
आभाळ,
मतला अगदी सहज-सुंदर आहे. 'भाव'ही.
विदूषकाचा शेर मात्रांच्या दृष्टीनं योग्य आहे; पण खटकला. २ लघुंचा गुरू करताना मला वाटतं गेयतेच्या दृष्टीनं काही मर्यादा पाळायला लागतात. उदा. विदूषक मधे चालेल; पण त-चि मधल्याप्रमाणे नको.... अर्थात हे माझं मत.
- कुमार
आभाळ भरून आले!
गझल आवडली.
मक्ता चुकल्यासारखा वाटला. अर्थात माझी अल्पमती! पण चुल सांधणे एकवेळ ठीक, पण रांधणे? माझ्या मते, स्वयंपाक करणे म्हणजे रांधणे. चूल विझलेली रांधून चा अर्थ लागला नाही. चुभुद्याघ्या.
बाकी,
हुंदका साधा तुझा सांगून गेला -
'श्वास शब्दांचा जरा थांबून गेला.'
- झकास!
जो विदूषक मीच भिंतीत चिणलेला
हासण्याची लक्तरे टांगून गेला.
- सही!
ज्या तुझ्या भासासवे मी जगत गेलो
तोच उंबरठ्यास ओलांडून गेला.
- उच्च
सरळ-साध्या जीवनाची मागणी ती,
जीवेघेणे द्दूत तो मांडून गेला.
-बहोत अच्छे!
पाहिले प्रतिबिंब मी अंधारलेले...
आरश्याशी चेहरा भांडून गेला.
-अंधारले प्रतिबिंब सही!
काय नशिलेपण तुझ्या गज-यात होते!
श्वास घेता जन्म गंधाळून गेला!
- :) मला आता खात्री वाटायला लागली आहे, हिरवळीविषयी!!
ती नजाकत भावनांच्या पैंजणांची...
का व्यथांचा ताल किंचाळून गेला?
- हं, दुविधा मस्त. इथे पैंजणे वर गजरा! :)
का तुलाही साक्ष देऊ चांदण्यांची?
चंद्र तो दारात रेंगाळून गेला.
- उला मिसरा थोडा अवघडला आहे. पण अर्थ सुंदर.
तो तसाही कोरडा पाऊस होता,
पापणीला आसवे बांधून गेला.
- जियो!
वा छानच
तो तसाही कोरडा पाऊस होता,
पापणीला आसवे बांधून गेला.
मस्तच.
आभाळ खरं सांगू?
काय नशिलेपणा.. सर्वात सुंदर!
काय च्या जागी हाय! घेऊन वाचले तर वेगळाच परिणाम येतो.
त्यातून नशिलेपण सहज मराठी शब्द वाटत नाही.
ती नजाकत.. इतका हळुवार मिसरा आहे की उल्या मिसर्यात किंचाळाणे खुपच क्रुर वाटते.
ज्या तुझ्या भासासवे मी जगत आलो.. ?
जो विदुषक .. शेर कळला नाही.. कोणी सांगेल? आभळ?
खरं सांगू??
" काय च्या जागी हाय! घेऊन वाचले तर वेगळाच परिणाम येतो"... खरंच 'हाय!' घेऊन वाचले आणि शेर वेगळाच वाटला :)
"उल्या मिसर्यात किंचाळाणे खुपच क्रुर वाटते."... किंचाळलो खरं ...पण व्यथाच तश्या होत्या... पैंजणांची आत्मधुंदी झटक्यात उतरून गेली... म्हणून किंचाळावे लागले :(
"ज्या तुझ्या भासासवे मी जगत आलो.. ?" 'आलो' कि 'गेलो'??? 'गेलो' चा effect 'आलो' पेक्षा वेगळा आहे हे मात्र खरं...
'जो विदुषक .. शेर कळला नाही.. '
इथे हेच सांगायचे आहे की 'स्वत:च्या आयुष्यातून विदूषकासारखा स्वच्छंदी पणा स्वत:च्याच हातून गमावून बसलो... आयुष्य गंभीरपणे जगण्याचा आव आणला... अंतरंगातील निरागसता... क्षणापुरतं दु:ख विसरायला लावणारे आनंदाचे चार दोन क्षण ... मी स्वत:हून ह्या सगळयाला तिलांजली दिली... आत्मवंचनेच्या भिंतीत चिणलं त्यांना... शेवटी तरीही उरली ती सगळ्या निरागस क्षणांची लक्तरं... आनंदाची लक्तरं... हासण्याची लक्तरं...'
--धन्यवाद,
आपले आभाळ :)
हं..
आभाळ
विदुषकाचे 'स्वतःचे दुःख लपवून हसवणे' या संदर्भाने वाचल्याने शेर समकजला नाही.
स्वच्छंदीपणा.. विचार करतेय.
दखलीसाठी धन्यवाद.
सुरेख
आभाळ सुरेख गजल! आवडली.
चांदण्यांची साक्ष
चांदण्यांची साक्ष आणि चषक चा शेर मस्त जमून आलेत. विशेष आवडले