मुक्तके

अनि's picture

हळुवार पैंजणांचा भलताच वार झाला....
त्याच्यात जीव माझा बेहोश पार झाला...
लाजून झाकले बघ डोळे ग चांदण्यांनी,,
एकेक चांद वेडा तेथेच ठार झाला...

रात्री अशा प्यासा मला सोडून ती गेली कुठे??
चंद्रास त्या सोडून तेवा चांदणी गेली कुठे??
मदिरालयी हा मद्यपी मदिरेस आहे शोधतो...
ओठांस तुझिया लाजुनी मदिरा ग ती गेली कुठे??

चंद्रास रात वेडी सोडून जात आहे..
नाते कळ्या-फुलांचे तोडून जात आहे..
काहीच ना कळेना कुठली असे नशा पण
श्वासांस हाय अमुच्या जोडून जात आहे..

स्वप्नात आसवांनी भिजवून रात गेली
विरहास आठवांनी सजवून रात गेली
माझ्यात झोपते ती मग मी कुठे निजावे??
डोळ्यात शायरीच्या निजवून रात गेली..

बहकून शांत रात्री स्वप्नात ने मला तू..
ओठांस हाय माझ्या ओठांत घे जरा तू..
लाजून लाल झाले हे शब्द रेशमाचे,
ओथंबल्या शब्दांचा झंकारता झरा तू..

शायराचा शायरीचा हाय आला पावसाळा
चांदवेड्या , रातवेड्या पाखराचा पावसाळा
कोणता आहे ऋतू डोळ्यामधे हा दाटलेला??
प्रेमिकांचा,पाकळ्यांचा,आसवांचा पावसाळा

केव्हाच शब्द गेले शोधावया तुला गं..
ती सापडे न आम्हा ते सांगती मला गं..
तू सांग ना मला की , शोधू कुठे तुला मी??
माझ्यात मीच वेडे पाहू कसे मला गं??