कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
प्राण माझा देह हा सोडून गेला
दाट होते मेघ गगनी भारलेले
नीर भरला मेघ का वाजून गेला
आज चुकले बोल माझे का सख्यारे
जीव हा माफी तुझी मागून गेला
दुःख जाण्याचे असे येथे क्षणाचे
गाव माझा आज मज विसरून गेला
भार जो तो हा तनाचा वाहतो रे
प्राण हा अतनू जणू होऊन गेला
काळ, सीमांचा न आता बंध देही
लौकिकाचे पाश ही तोडून गेला
देह असता, आस जी जीवास होती
अंतराळी आज ती सांडून गेला
सांग मज पाण्यात टाळी वाजते का
शांत डोहा कोण हादरवून गेला
भास ग्रीष्माचे, कसे होती वसंती
बहर बागेचा कसा उधळून गेला
मावते ब्रह्मांड का डोळ्यात सारे
भाव विश्वाचे कसे दावून गेला
जीवनाचा कलह जीवा व्यर्थ भासे
श्रीहरीच्या संगती रंगून गेला
प्रतिसाद
वाह... सुधीर ...वाह !
लौकीकाचे पाश... मस्तच रे !
भार जो तो... हा शेर पुसट वाटतोय मला... अतनू हा शब्द परिचयाचा नाही..!
बहर बागेचा... आह !
मक्ता.. अप्रतिम रे मित्रा !
लौकिकाचे पाशही तोडून गेला
एकही शेर ठराविक गुणवत्तेच्या खाली जात नाही हे ह्या गझलेचे वैशिष्ट्य वाटले. गुणवत्तेचे इतके सातत्य एखाद्याच गझलेत बघायला मिळते.
काळसीमांचा न आता बंध देही
लौकिकाचे पाशही तोडून गेला
आवडले.
वा सुधीर
दुःख जाण्याचे असे येथे क्षणाचे
गाव माझा आज मज विसरून गेला
गझल छानच पण हा शेर सर्वात जास्त आवडला
ठीक आहे.
दुःख जाण्याचे असे येथे क्षणाचे
गाव माझा आज मज विसरून गेला -झकास!
भास ग्रीष्माचे, कसे होती वसंती
बहर बागेचा कसा उधळून गेला - चांगला आहे.
सानी मिसरा असा केला तर?-
मोहराचा जन्म तो जाळून गेला. (इथे 'जन्म' ऐवजी दुसरा समर्पक शब्द वापरता येईल.)
अतनुबद्दल शंका आहे.
हीच गझल याहून चांगली लिहू शकाल असा विश्वास आहे.थोडे काम केले पाहिजे.
माझे-५/१०.
वा!
वा सुधीर,
मक्ता आणि भास ग्रीष्माचे हे शेर आवडले.
मतला आणि इतर अनेक शेर थोडे अजून नीट जुळवायला हवे होते असं मात्र वाटलं. (उदा. मेघांचा शेर.. त्यातली कल्पना मला समजली नाही.)
तसंच 'जीव माफी मागून गेला' हे खटकलं, पहिल्या ओळीशीही जुळवा-जुळव सहज वाटली नाही. त्यापेक्षा तो शेर तृतीयपुरुषी करून -
एवढे अपराध कसले त्याचे सख्या रे
जन्मभर तो का क्षमा मागून गेला
असा (किंवा यापेक्षा खूप चांगला) बदल सुचवावासा वाटला.
-कुमार
छान...
छान आहे गझल, सुधीर.
'लौकिकाचे पाश' आणि 'दु:ख जाण्याचे' विशेष आवडले.
पु.ले.शु.
- नचिकेत आठवले
धन्यवाद
माणिक, प्रणव, वैभव, विसुनाना, कुमार, नचिकेत
अभिप्रायासाठी धन्यवाद.
माणिक: अतनू म्हणजे शरीर नसलेला. इथे मला शरीर नसलेले व त्यामुळे भौतीक, सामाजीक बंधनातून मुक्त असे चैतन्य अपेक्षीत आहे;
तसच अजून एक अर्थ असाही येतो की शरीर नसल्याने अतनू अवस्थेत मी (तुझ्याबरोबर) सर्वत्र आहेच;
आणखी एक म्हणजे अतनू म्हणजे शरीर नसलेली शक्ती म्हणजेच देव ही होऊ शकेल म्हणजेच शरीराचा भार त्यागून आता मी देवाशी एकरूप आहे.
कुमार :
आज चुकले बोल माझे का सख्यारे
जीव हा माफी तुझी मागून गेला
यात
माझे बोलणे चुकले असेल तर त्यासाठी तुझी माफी मागून जात आहे
किंवा माझे काही चुकले असेल तर तू बोल, त्यासाठी तुझी माफी मागून जात आहे
असा अर्थ अपेक्षीत आहे.
सुधीर