झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे

मिलिंद फणसे's picture

झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे
वृद्धाश्रमात त्यांना भरती करू, चला रे

अग्नीस काष्ठ लागे, अग्नीस तेल लागे
जळतात इंधनाविण पोटातले निखारे

येथे युगायुगांची चाले उपासमारी
अन्नान्न माणसांना मिळती अमाप नारे

वाया अनेक गेली नापीक वाम वर्षे
पाण्यात मृगजळाच्या पिकतील का शिवारे ?

घेतात लोक हल्ली का मुक्त श्वास येथे ?
बसवा पुन्हा मनांवर ते कालचे पहारे

जाती नव्या दिशांना शोधात संपदेच्या
रस्त्यात माणसांच्या पेरा जुने निखारे

निर्धास्त व्हा सुरांनो, अमृत न मागतो मी
बस, मेघमाऊलीचे तम-ऊर दाटवा रे

सोप्या करून सांगू जखमा, मिलिंद, त्यांना
करतात क्लिष्टतेचा आरोप वाचणारे

आशुतोष's picture

सुंदर गझल मिलिंद !

अग्नीस काष्ठ लागे, अग्नीस तेल लागे
जळतात इंधनाविण पोटातले निखारे
वा सुंदर !

वाया अनेक गेली नापीक वाम वर्षे
पाण्यात मृगजळाच्या पिकतील का शिवारे ?
उच्च कल्पना !!!

निर्धास्त व्हा सुरांनो, अमृत न मागतो मी
बस, मेघमाऊलीचे तम-ऊर दाटवा रे
वा ! या शेर मधे तोफेत दारुगोळा भरावा तसा अर्थ ठासुन भरल्यासारखा वाटतो :)

..आशुतोष

मानस६'s picture

मस्त

निर्धास्त व्हा सुरांनो, अमृत न मागतो मी
बस, मेघमाऊलीचे तम-ऊर दाटवा रे

सोप्या करून सांगू जखमा, मिलिंद, त्यांना
करतात क्लिष्टतेचा आरोप वाचणारे

दोन्ही शेर आवडले.. अमृत न मागतो मी..ह्यात 'न' ही एक जास्तीची मात्रा लागली आहे, बघ काही करता आल्यास
मेघमाऊलीचे तम-ऊर दाटवा रे..अतिशय सुंदर कल्पना ..
शिवारे पण मस्तच पण काही शेर स्पष्ट होत नाहीत ..
-मानस ६

मिलिंद फणसे's picture

मात्रा

मानस,

मी मात्रा पुन्हा मोजून पाहिल्या, बरोबर वाटतायत.

गा गा ल गा ल गा गा । गा गा ल गा ल गा गा
नि र्धा स्त व्हा सु रां नो । अ मृत न मा ग तो मी

कुठे चुकलय हे दाखवलस तर दुरुस्ती करीन.
अभिप्रायाबद्दल आभार.
-मिलिंद

आनंदयात्री's picture

सुंदर गझल...

मिलिंदादा....
वाह वाह...
मतल्यापासून मक्त्यापर्यंत great!!
प्रत्येक शेर स्वतंत्र कविता वाटते..

निर्धास्त व्हा सुरांनो, अमृत न मागतो मी
बस, मेघमाऊलीचे तम-ऊर दाटवा रे
लय भारी...!!

फक्त एक शंका, "अन्नान्न" चा अर्थ काय? "भुकेले" असं म्हणायचंय का?

आभाळ's picture

उच्च उच्च गझल !!

वा मिलिंदादा... कोणता एक शेर आवडला म्हणून सांगू?
सगळेच एकापाठोपाठ काळजात घुसले ...आह!!
आपला आभाळ :)

मिलिंद फणसे's picture

अन्नान्न

"फक्त एक शंका, "अन्नान्न" चा अर्थ काय? "भुकेले" असं म्हणायचंय का?"

हो. प्रतिसादाबद्दल आभार.

-मिलिंद

गिरिराज's picture

मतल्यासह

मतल्यासह सर्वच शेव्र अप्रतिम... शिवारे आणि अग्नी विशेष आवडले!

चक्रपाणि's picture

वा!

घेतात लोक हल्ली का मुक्त श्वास येथे ?
बसवा पुन्हा मनांवर ते कालचे पहारे

वा! आवडले. हझल छान झाली आहे.
शुभेच्छा.

मृण्मयी's picture

हझल ?

"हझल" ?
ही हझल कशी ?

"सौ रूप धरे जीने कि लिये, बैठे हैं हज़ारों ज़हर पिये,
ठोकर ना लगाना हम खुद हैं गिरती हुई दीवारों की तरह ।"

चक्रपाणि's picture

क्षमस्व

मिलिंदपंत,
गझलेचा उल्लेख हझल असा झाल्याबद्दल दिलगीर आहे.
ग आणि ह ही दोन अक्षरे कळफलकावर शेजारीशेजारी असल्याने चुकीने ग ऐवजी ह टंकित झाला, त्याबद्दल क्षमस्व.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मृण्मयींचे आभार . मृण्मयी, तुम्ही लिहिलेला शेर मस्त आहे :)

मृण्मयी's picture

माझा नाही

चक्रपाणि,
हा शेर मजरूह सुल्तानपुरींचा आहे. 'ममता' चित्रपटातील 'रेहते थे कभी जिनके दिलमें' या गझलेतील. मी फक्त तो signature म्हणून वापरला आहे.

"सौ रूप धरे जीने कि लिये, बैठे हैं हज़ारों ज़हर पिये,
ठोकर ना लगाना हम खुद हैं गिरती हुई दीवारों की तरह ।"

समीर चव्हाण's picture

एक सकस गझल

एक सकस गझल वाचायला मिळाली, छान!

केशवसुमार's picture

वा..

मिलिंदराव
एकदम झकस गझल..
सगळेच शेर आवडले..

नेहमी प्रमाणे आमचा एक खोडकर प्रतिसाद इथे वाचा  

केशवसुमार

कुमार's picture

सुंदर

मिलिन्दपंत,
अप्रतिम गझल... अतिशय आवडली.

अग्नीस काष्ठ लागे, अग्नीस तेल लागे
जळतात इंधनाविण पोटातले निखारे - वा! अप्रतिम शेर.
बसवा पुन्हा मनांवर ते कालचे पहारे - सुरेख!

मक्ताही अगदी वेगळा आणि सुंदर आहे.
- कुमार

जयश्री अंबासकर's picture

जियो!

मिलिंद, गझल खूप खूप आवडली.
मतल्यामधली कल्पना एकदम जबरी !

निर्धास्त व्हा सुरांनो, अमृत न मागतो मी
बस, मेघमाऊलीचे तम-ऊर दाटवा रे

हा शेर मात्र कळला नाही....... कुणी सांगणार का ....?

मिलिंद फणसे's picture

अर्थ

जयश्री,
अभिप्रायाबद्दल आभारी आहे..
त्या शेराचा शब्दार्थ :
सुरांनो (देवांनो) निर्धास्त राहा. आम्ही तुमच्याकडे अमृत मागत नाही. पण निदान काळ्या ढगांच्या उरी अमृततुल्य पाणी भरून तरी पाठवा - पाणी भरलेले मेघ तरी द्या.
लक्ष्यार्थ : सत्ताधाऱ्यांनो, आम्ही तुमच्याकडून स्वर्गसुखाची अपेक्षा करत नाही. पण निदान जनतेला पिण्यास पाणी मिळण्याची तरी सोय करा.

वैभव's picture

सुंदर

मिलिंदा,

सुंदर गझल . मक्त्यासहित. :-)

चिन्नु's picture

वाह!

निर्धास्त व्हा सुरांनो! क्या बात है!!
नवीन रक्त धावून आले वाचतांना. :) खूप सही. असेच लिहत रहा.

चिन्नु