कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..

हुंदका साधा तुझा सांगून गेला
झाकलेली वेदना बोलून गेला
पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी पाऊस हा बरसून गेला
सावरु मी हा कसा संसार माझा
मांडलेला डाव तो उधळून गेला
प्रीत माझ्या अंगणी बहरेल कैसी
कोवळे अंकूर तो जाळून गेला
ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला
वावडे होते जरी तुज मैफ़लीचे
सूर का मग आगळे छेडून गेला
मी अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला
वाट माझी ही अशी अंधारलेली
आठवांनी का अशी उजळून गेला
जयश्री
३०.३.२००७
प्रतिसाद
वाहवा !!
मतला आणि
ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला
वावडे होते जरी तुज मैफ़लीचे
सूर का मग आगळे छेडून गेला
मी अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला
हे शेर खूप आवडले.
मतल्यातली 'झाकलेली वेदना' तर अप्रतिमच.
'आभाळ काळे' असे का? म्हणजे आभाळाला काळे का म्हटले ते कळलं नाही. positive की negative अर्थाने का वस्तूनिष्ठ??'आभाळ काळे' मध्ये 'काळे' पटलं नाही. तरी सुध्दा सानी मिसर्यामुळे शेर आवडला. 'अंतरी पाऊस बरसणे' भलतंच सुंदर :) बाकीचे शेर नेहमीचे तरीही सुंदर.
पुन्हा एकदा गझलेला वाहवा!
--आभाळ :)
काळे आभाळ
आभाळ .... तुला काळे म्हटलं म्हणून राग आला का रे.... ;)
अरे इथे त्याच्या किंवा तिच्या डोळ्यातलं निराशेचं, दु:खाचं काळं आभाळ बघून अंतरात पाऊस बरसून गेला.......असं म्हणायचं होतं मला.
बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार .
"तुला काळे
"तुला काळे म्हटलं म्हणून राग आला का रे.... ;)"
हाहाहाहा!!! मजा आली :)
काजळ?
मला वाटते 'काळे आभाळ' मधील 'काळे' हे डोळ्यातील काजळाला उद्देशून म्हटले असावे. अशा काजळामुळे खुललेले तिचे डोळे = काळे आभाळ. आणि ते पाहून माझ्या हृदयात प्रणयाचा पाऊस बरसून गेला, असे काहीसे. पण असे असेल, तर आभाळ पाहिल्यामुळे पाऊऽ बरसतो, हे जरा विचित्र वाटते आहे (आभाळ आल्यामुळे पाऊस बरसतो ना!) कदाचित वेगळेही असेल. एकाच शेरातून असे भिन्न अर्थ निघाले, तर चांगलेच आहे. जाणकारांपेक्षाही जयश्री स्वत: त्यांना काय अपेक्षित होते हे जास्त चांगले सांगू शकतील. पण हा आभाळाचा शेर मलाही आवडला.
त्याचबरोबर, दुबळेपणाचा शेरही चांगला वाटला.
- परीवश
काजळामुळे
काजळामुळे खुललेले तिचे डोळे = काळे आभाळ.
हा अर्थ आवडला.
म्हणून शेरही आवडतो आहे आता :)
छान गझल!!
जयश्री,
छान आहे गझल!!
'कोवळे अंकूर', 'निखळलेला दुवा' आणि 'चेहरा' हे शेर आवडले.
आभाळ,
मला वाटते खूप ढग दाटून आले म्हणून 'काळे'. सानी मिसर्यातल्या 'बरसून' मुळे मला असा अर्थ वाटला. बाकी, स्वतः गझलकार स्पष्टीकरण देतीलच!
- नचिकेत आठवले
छान !, आभाळ..
हो, मलाही भरून आलेलं आभाळ असंच वाटलं.
मला शेवटचे दोन शेर सर्वात आवडले.
चांगली गजल आहे.
- हे शेर विशेष चांगले जमले आहेत.
वावडे होते जरी तुज मैफ़लीचे
सूर का मग आगळे छेडून गेला
मी अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला
पुढे उल्लेख केलेल्या शेराबद्दल एक गोष्ट सांगायला हवी, ती अशी की पहिल्या ओळीत रदीफ एकटा येणं तांत्रिक दृष्ट्या योग्य नाही. रदीफ चा शब्द पहिल्या ओळीतच निराळ्या जागी आल्यास चालेल. अधिकारी मंडळींकडून खात्री करून घ्यालच.
ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला
-सतीश
छान
छान आहे गझल.
मतला जास्त आवडला.
सुधीर
छान!
जयावी
संसार माझाच म्हणायचं होतं का तुला? म्हण्जे तू डाव उधळून गेलास म्हणून माझा?
ओळखीचे.. आणि राहता.. हे दोन शेर होऊ शकतात ना?
चू भू द्या घ्या
लिहीत रहा. आणि फोटोत हसतेस तशी आनंदी रहा.
वाटच पहात होतो तुझ्या गजलेची !
मस्त उतरलिये जया !
प्रीत .. खूप आवडला !
ओळखीचे हास्य... जवाब नही !
वावडे.. जबरीच !
मक्ता... छाने !
चांगली आहे.
पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी पाऊस हा बरसून गेला
ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला
वावडे होते जरी तुज मैफ़लीचे
सूर का मग आगळे छेडून गेला
या शेरांमधील कल्पना आवडल्या.
तुज आणि गेला - हे थोडे खटकले.
गझलेचा सूर शेवटपर्यंत कायम राहिला हे ही यश!
परत एकदा शेवटचा हात फिरवला असता तर बरे झाले असते असे वाटले.
बाकी ठिकठाक. माझे - ६/१०.
साधी सोपी
छान वाटली गजल.
ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला
वावडे होते जरी तुज मैफ़लीचे
सूर का मग आगळे छेडून गेला
हे शेर आवडले. सर्वच सानी मिसरे छान आलेत. उला मिसरे फार साधे झाले.
चुभुद्याघ्या.
-तुझी चिन्नु
छान...
गझल जयु!
मतला, आभाळ आणि दुबळी हे शेर आवडले.
दुवा हा शेर नीट कळला नाही.
या "कैसी" शब्दाचे काहितरी कर जयु.. मागेही तुझ्या एका गझलेत आला होता. नाही म्हटलं तरी त्याने जरा अडखळायला होतच..
-- पुलस्ति.
सुंदर
जयश्री,
गझल आवडली.
मतला तर अगदी सहज सुंदर झाला आहे.
'मांडलेला डाव तो उधळून गेला' हा शेरही आवडला. (ही ओळ मला मतल्यासाठी सुचली होती.. पण नंतर बदलली.).
- कुमार्
गझल
मतला आवडला
जयश्री आवड
जयश्री
आवडली गजल.
मतला - झाकलेली वेदना मस्तय.
आभाळाचा शेर - पहिल्याच वेळी वाचताना "त्याच्या डोळ्यात आभाळ झाकोळून आल पण दु:ख मात्र तिच्या मनावर बरसून गेल" असा काहिसा अर्थ मला लागला.
ओळखीचे हास्य, आभाळ आवडलेच.
मी अशी दुबळी पुन्हा - जबरदस्तच आहे हा शेर, सगळ्यात भिडला. - माझ्यामते हा मक्ता हवा होता, गं.
-- शलाका
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला
जयश्री, गझल आवडली.
मतला छान निभावला आहे.
पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी पाऊस हा बरसून गेला
कल्पना आवडली.
मी अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला
वा. हा शेर खूप खूप आवडला.
वाह!
जया, आप तो pro होती जा रही है! :)
सुरेख गजल. आवडली!
कोवळे अंकूर
कोवळे अंकूर चा शेर मस्त आहे.
राहता तो ही दुवा निखळून गेला सारखा मिसरा " राहिलेलाही दुवा निखळून गेला" असा सरळ लिहीला तर जास्त परिणामकारक ठरेल असे वाटते . विशेषत: उला मिस-यात "तो" हा शब्द आल्याने सानी मिस-यात वेगळ्या अर्थाने तो टाळून संदिग्धता घालवता आली तर उत्तम