कार्यशाळा प्रवेशिका ३ : प्रमोद बेजकर - हझल

हुंदका साधा तुझा सांगून गेला
की,तुझा नवरा पुन्हा भांडून गेला

स्वच्छ घासुन दात, केले स्नान ही मी
तो तरीही का असा लांबून गेला?

तो म्हणाला की इरादा 'नेक'आहे
अन गळ्याला फास तो टांगून गेला

ज्या जमावाने दिली ना दाद कोणा
मागता मी वर्गणी पांगून गेला

सांडले नाणे कुठे? शोधीत होतो
सांगते ती, तो घरी रांगून गेला

थांबली स्वप्नात येण्याचे तशी ती
तो जसा मुंडावळ्या बांधून गेला

प्रतिसाद

नचिकेत's picture

मस्त! :-)

प्रमोद,

मस्त हजल!!!
'लांबून', 'टांगून' आणि 'पांगून' आवडले. :-)

- नचिकेत आठवले

ज्या

ज्या जमावाने दिली ना दाद कोणा
मागता मी वर्गणी पांगून गेला

हाहाहाहाहाहा :)
छान हझल आहे.

क्या बात है!

मस्तच.
थांबली.. सही!

हा हा हा , आ हा हा

तो म्हणाला की इरादा 'नेक'आहे
अन गळ्याला फास तो टांगून गेला
'नेक' (neck) - असा इन्ग्राठी श्लेष या जगात पहिल्यांदा वाचला.
प्रमोदा, अजब तूच 'सर'दार! (Sir)

सांडले नाणे कुठे? शोधीत होतो
सांगते ती, तो घरी रांगून गेला
'आवाज' दिवाळी अंकातल्या गोष्टीसारखा!

सारेच थेर (गझल : हझल :: शेर : थेर) जमून आलेत.
खरेतर ही 'गझल' कार्यशाळा आहे. 'हझल'ला कसे मोजावे?
तरीही माझे - ९/१०!

आभार्

सर्वांचे आभार.खरंतर प्रतिसादांना भीत होतो,आणि विशेषत: नानांच्या मार्कांना. पण नानांनी चकित केलं.त्यांच्या साठी हा एक (पाव)शेर.
मार्क देतिल केवढे? आशंक होतो
पण 'नऊ'ने जीव आनंदून गेला

रसिक's picture

मस्त्

हजल आवडली. नेक, लांबून , टांगून आवडले!

:-) तुझा

:-)

तुझा नवरा पुन्हा भांडून गेला
तो तरीही का असा लांबून गेला?
मागता मी वर्गणी पांगून गेला

आवडले.

आनंदयात्री's picture

तो म्हणाला

तो म्हणाला की इरादा 'नेक'आहे
अन गळ्याला फास तो टांगून गेला

वा....

मस्त

प्रमोद, हजल आवडली.
पु. ले. शु.

चिन्नु

कुमार's picture

वा!

वा बेजकरपंत,

सुंदर हजल!

तो म्हणाला की इरादा 'नेक'आहे
अन गळ्याला फास तो टांगून गेला

हा शेर आणि मतला खूप आवडले. मुंडावळ्याही मस्तच!

- कुमार

मस्त! , अलामत..

प्रमोद, हझल आवडली.
'नेक'चा श्लेष तर बेस्टच!

मला यात तुम्ही वापरलेले (ला/ली?) कवाफी आवडले(ला/ली?). :)
नुकतंच इथे 'जुल काफिया' बद्दल वाचलं.
ह्या हझलमध्ये 'जुल अलामत' आहे असं म्हणता येईल का?

जयश्री अंबासकर's picture

वा!!

तो म्हणाला की इरादा 'नेक'आहे
अन गळ्याला फास तो टांगून गेला
क्या बात है!! एकदम लाजवाब!!

मक्ता भी एकदम बढिया :)

मस्त

प्रमोदजी

मस्त हझल . आवडली

व्वा

व्वा, प्रमोद
मस्त हजल
हे शेर तर खासच, आवडले.

स्वच्छ घासुन दात, केले स्नान ही मी
तो तरीही का असा लांबून गेला?

तो म्हणाला की इरादा 'नेक'आहे
अन गळ्याला फास तो टांगून गेला

सांडले नाणे कुठे? शोधीत होतो
सांगते ती, तो घरी रांगून गेला

सुधीर

मस्त!

मस्त हजल! 'नेक'चा श्लेष परफेक्ट! :)
सगळीच छान आहे!

नेक

प्रमोदजी

नेक आणि वर्गणीचा शेर उत्तम आहे. हझलचा म्हणता येणार नाही इतके कंगोरे आहेत. अभिनंदन