कार्यशाळा प्रवेशिका २ : प्रणव काळे

हुंदका साधा तुझा सांगून गेला
जे नको बोलायला, बोलून गेला

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)

राधिकेला भान नाही राहिले अन्
आज हा श्रीरंगही रंगून गेला

आज सुग्रीवास आहे कोण वाली?
राम तर त्रेतायुगी होऊन गेला

नेत्र मिटलेले तिचे, ओठात हासू
कोण तो स्वप्नामधे येऊन गेला?

- प्रणव सदाशिव काळे

प्रतिसाद

आनंदयात्री's picture

वा... प्रणव...

वा...
प्रणव... अपेक्षा पूर्ण केल्यात... तुमची "कुठे म्हणालो परी असावी" गझल अजून छान आठवते आहे...

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)
सुंदर...

अगदी

सहमत आहे.

सहमत

सहमत आहे

ठीक आहे.

वैशाखात बरसणे , श्रीरंगही रंगून जाणे
कल्पना आवडल्या.
आज सुग्रीवास आहे कोण वाली?
'वाली' स्लेष आवडला.

मला माहित आहे, तुमच्यातला शायर / कवी याहून चांगले लिहू शकतो.('परी')
बाकी ठीक. माझे - ५/१०. (कंजूस का दान!!:()

नचिकेत's picture

छान.

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)
वा!!!
- नचिकेत आठवले

वावावा!!! छा

वावावा!!!
छान गझल आहे हो प्रणवजी :)

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)
हे भयंकर आवडले.
मक्ताही सहज सुंदर :)
असेच लिहित राहा... तुमचे नाव वाचले कि मला नेहमीच 'कुठे म्हणालो परी असावी' आठवते :).
आत्तापर्यंत कित्येकदा गुणगुणली ती गझल...
पुढील प्रवासास आभाळभर शुभेच्छा.
-आपले आभाळ :)

गझल

गझल आवडली. मतला चांगला निभावला आहे.

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)
वाव्वा. फारच छान.

मक्ता असा केला तर
पापण्या मिटल्या तरी ओठात हासू
(काय तो स्वप्नामध्ये येऊन गेला?)

चित्तरंजन

सहमत

चित्तरंजनरावांशी सहमत आहे.

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)

हा शेर खास आवडला!

जयश्री अंबासकर's picture

सुरेख!

प्रणव.....खूप छान !!
मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)........ मस्तच!!

आज सुग्रीवास आहे कोण वाली?
राम तर त्रेतायुगी होऊन गेला
वा...........सुरेखच!
प्रणव, तुझी परी मात्र खरंच तुला विसरु देत नाही :)

रसिक's picture

बरसणे

गझल आवडली,
मी बरसणे सोडलेच नाही, वा वा! हा शेर सर्वाधिक आवडला.

मला काही वाक्य कंसात का लिहीतात ते सांगाल का ? स्वगत का?

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)

राधिकेला भान नाही राहिले अन्
आज हा श्रीरंगही रंगून गेला

आज सुग्रीवास आहे कोण वाली?
राम तर त्रेतायुगी होऊन गेला

हे शेर आवडले.

हाच प्रश्न

मी मायबोलीच्या कार्यशाळेत विचारला होता - बहुदा बैरागींच्या गझलेवर. समाधानकारक उत्तरे मिळालीच नाहीत. मग मी नाद सोडून दिला. मला तरी कंसात लिहिण्याचे काहिही तर्कशुद्ध प्रयोजन दिसले नाही. बैरागींच्या त्या गझलेतही आणि प्रणवच्या या अतिशय सुंदर शेरातही.
-- पुलस्ति.

परीवश's picture

हो

हो. कंसात लिहिलेली वाक्ये मुख्यत: स्वगत स्वरूपाचीच असतात. तसेच वरच्या ओळीत स्पष्ट न झालेला अर्थ अधिक स्पष्ट करणे, हे सुद्धा बरेचदा त्यांचे प्रयोजन असते.

गझल आवडली. त्रेतायुगातील रामाचा शेर सगळ्यात जास्त आवडला. वैशाख वैतागून जाण्याच्या शेरामधील 'नाहीच नाही' जरा खटकले. ते बदलता येईल का, याबाबत विचार करावासा वाटतो.

- परीवश

गजल छान आहे

पण परी खुपच छान आहे! :)

मस्तच!

प्रणव - गझल आवडली.
वैशाख आणि वाली विशेष!!
-- पुलस्ति.

छानच रे !

प्रणव... मस्त उतरलिये रे !
मी बरसणे.... खूप आवडला !
मक्ता... वाहवा !

मस्तच!

प्रणव, तुमचा वैतागलेला वैशाख आणि सुग्रीवाचा 'वाली' (आणि त्यावरचा श्लेष) खूप आवडला. पण तुमचं नाव घेतल्यावर "परी" आठवते ती आठवतेच ;)
लिहित रहा!

परीमुळे

छान !
मी बरसणे .. मस्तच.

परीमुळे अपेक्षा वाढल्यात खर्‍या.

आभार, कंस

माझ्या स्मरणशील मित्रमैत्रिणींनो, प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.

गझलेतल्या बाकीच्या ओळी मोठ्याने म्हणत असताना एखादी ओळ कुजबुजावीशी वाटली म्हणून ती कंसात ठेवली. एखाद्या खास व्यक्तीला कानात सांगावी तशी. '(' आणि ')' ह्या दोन खुणा म्हणजे कानगोष्टी खेळताना केलेल्या हाताच्या पाकळ्या समजा :-)

परी कुठे सापडेल?

या परी ने उत्सुकता खूपच चाळवली आहे. कुठे वाचायला मिळेल?अर्थात एखादया पूर्वीच्या गझलशी सारखी तुलना करत राहणं कवीवर अन्याय कारक ठरण्याची ही शक्यता आहे.तरीही...

८७

कुठे म्हणालो परी असावी ही गझल http://www.marathigazal.com/node/87 इथे आहे.

कुमार's picture

रंगून गेला..

प्रणव,
सुंदर गझल...

राधिकेला भान नाही राहिले अन्
आज हा श्रीरंगही रंगून गेला - हा शेर अतिशय आवडला!

मतलाही अगदी सहज आला आहे.

- कुमार

बेजार

हम हैं मुश्ताक और वो बेजार
या इलाही ये माजरा क्या है?
-मिर्जा गालिब्
(मुश्ताक = आतुर)
हे वाचता वाचता सापडलं.

मी बरसणे सोडले नाहीच नाही
(शेवटी वैशाख वैतागून गेला)
Great minds think alike?

छान

प्रणव, छान आहे गजल.