कळेना

पाखराना पोसणारा कोण आहे ते कळेना
तापलेल्या या धरेला नाहतो कोणी कळेना.
मेघमालेच्या या रथाला ओढतो कोणी कळेना
चांदण्यांची रंगावली घालतो कोणी कळेना.
माणसांच्या या जथ्यातिल कोण कैसा ते कळेना
ओळखेना चेहरा अन भाव डोळ्यातिल कळेना.
माणसांच्या ओठातली पोटातली सीमा कळेना
ईर्षा कळेना, द्वेष आणि भूकही काही कळेना.
अंतराळाचा हा पसारा, विस्तीर्णता त्याची कळेना
अन मनाच्या सागराचा थांगही कांही कळेना.
आजवर जे मज कळाले, उपयुक्तता त्याची कळेना
उपयुक्तता आहे कशाची तेहि पण मजला कळेना.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
व्वा
सुंदर